नवी दिल्ली येथून आलेले अल्पसंख्यांक आयोगाचे आयुक्त जनगौडा यांनी बुधवारी जिल्ह्यातील विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन कामकाजाची माहिती जाणून घेतली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीप्रसंगी व्यासपीठावर आयुक्त जनगौडा यांच्यासमवेत जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही. हे उपस्थित होते. बैठकीच्या प्रारंभी दर्शन एच व्ही यांच्या हस्ते अल्पसंख्यांक आयोगाचे आयुक्त जनगौडा यांचा म्हैसुरी पगडी घालून तसेच शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. सदर आढावा बैठकीत आयुक्त जनगौडा यांनी प्रत्येक खाते काय काय काम करते. केंद्राकडून त्यांना किती निधी मिळतो? त्याअंतर्गत कोणती कामे केली जातात, सोयी-सुविधा दिल्या जातात. राज्य सरकारकडून किती निधी मिळतो त्याचा विनियोग कसा केला जातो. याखेरीज कोणत्या गोष्टींची कमतरता आहे आणि कोणत्या गोष्टी पुरेशा मिळत नाहीत आदींबाबत माहिती जाणून घेतली. त्याचप्रमाणे कोणत्या योजना अथवा कामे प्रलंबित आहेत आणि ती का प्रलंबित आहेत? हे देखील त्यांनी जाणून घेतले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते यासीन मकानदार यांनी कोरोना काळात रुग्णांचे हाल झाले आणि त्यावेळी वैद्यकीय सुविधा देखील व्यवस्थित दिल्या गेल्या नाहीत. त्याचप्रमाणे कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातलगांना संबंधिताचा कोरोनाने मृत्यू झाल्याचा दाखलाही देण्यात आला नसल्यामुळे सरकारकडून मिळणाऱ्या नुकसान भरपाईपासून त्यांना वंचित राहावे लागल्याची तक्रार केली. खानापूर तालुक्यातील मराठी शाळांमध्ये निर्माण झालेल्या कन्नड शिक्षकांच्या कमतरते बाबतही बैठकीत तक्रार करण्यात आली.
कोरोना प्रादुर्भाव आणि ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर सदर बैठकीत त्यासंदर्भातील तयारी -उपाय योजनांची माहिती घेण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिधर मुन्याळ यांनी कोरोना तपासणी आणि उपचारासंबंधी आयुक्तांना माहिती दिली.
त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या अधिकाऱ्यांनी आपल्या तालुक्यात असलेले हॉस्पिटल्स, प्राथमिक आरोग्य केंद्रे आदींची माहिती देऊन कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आकडेवारी बैठकीत मांडली. सदर बैठकीस अल्पसंख्यांक आयोगाशी संबंधित सर्व सरकारी खात्याचे अधिकारी उपस्थित होते.