कर्नाटकात माजी मुख्यमंत्री बी एस येडियुराप्पा यांना हटवून त्यांच्याच आवडीचे बसवराज बोम्माई यांना मुख्यमंत्री बनवण्यात आले खरे, मात्र नवीन 2022 या वर्षात कर्नाटकाला पहिल्याच महिन्यात नवा मुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा जोरात सुरू आहे.
विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या पायावर शस्त्रक्रिया केली जाणार असल्यामुळे ते या शस्त्रक्रियेसाठी दोन महिन्याच्या दीर्घ कालावधीसाठी अमेरिकेत जाणार आहेत. त्या काळात कर्नाटकाचा कारभार चालवण्यासाठी कायमस्वरूपी मुख्यमंत्र्याची गरज असून बसवराज बोम्माई यांच्या जागी नवीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली जाणार असल्याची शक्यता सध्या वर्तविण्यात येत आहे.
यासंदर्भात भाजपच्या हाय कमांडची जोरदार चर्चा सुरू असून भाजप मधीलच ज्येष्ठ म्हणून ओळखले जाणारे मुरुगेश निराणी यांची नवीन मुख्यमंत्री पदी वर्णी लागणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
बागलकोट जिल्ह्यातील येथील मुरुगेश निराणी हे मुख्यमंत्रिपदावर विराजमान होतील की नाही? की बसवराज बोम्माई यांना मुख्यमंत्रिपदी ठेवले जाणार ? या संदर्भात विविध चर्चा सध्या ऐकायला मिळत असून जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बसवराज बोम्माई राजीनामा देणार असून
त्यानंतर मुरुगेश निराणी यांच्याकडे मुख्यमंत्रीपद येणार असल्याची चर्चा भाजप वर्तुळात जोरात सुरू आहे. यासंदर्भात भाजपचे हायकमांड कोणता निर्णय घेतात यावर पुढील निर्णय ठरणार आहे.