कर्नाटक विधानपरिषदेच्या 20 स्थानिक प्राधिकरणांच्या मतदारसंघातील 25 जागांसाठी शुक्रवारी मतदान झाले. 90 उमेदवार रिंगणात होते. आता निकालाची प्रतीक्षा असून मुकद्दर का सिकंदर कोण होणार याकडे डोळे लागले आहेत.
सकाळी ८ वाजता सुरू झालेले मतदान दुपारी ४ वाजेपर्यंत चालले. 14 डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहे.रिंगणात असलेल्या एकूण 90 उमेदवारांपैकी प्रत्येकी 20 भाजप आणि काँग्रेसचे, सहा जे डी एस, 33 अपक्ष आणि उर्वरित सर्व प्रादेशिक आहेत. उमेदवारांमध्ये चिकमंगळूरमधून केवळ एक महिला आहे.
या निवडणुकीसाठी मतदारांमध्ये शहरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडून आलेल्या सदस्यांचा समावेश आहे. विधानसभा किंवा लोकसभा निवडणुकीच्या विरुद्ध पद्धतीने प्राधान्याच्या मतांनी विजय ठरवले जातात.
25 विद्यमान विधानपरिषद सदस्यांपैकी 14 काँग्रेस, 7 भाजपा आणि 4 जे डी एस चे आहेत.त्यांचा कार्यकाळ 5 जानेवारी रोजी संपणार असल्याने ही निवडणूक तातडीने घेण्यात आली आहे.
सत्ताधारी भाजपला बहुमत मिळवायचे आहे. सभागृहातील सत्ता समीकरणावर मतदानाच्या निकालाचा परिणाम होईल. जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त करणाऱ्या भाजपला बहुमत मिळवण्यासाठी किमान १३ जागा जिंकण्याची गरज आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या गृह जिल्ह्य़ातील हंगलची जागा गमावल्यानंतर या निवडणुकीत चांगली कामगिरी करणे पक्षासाठी महत्वाचे आहे. काँग्रेसनेही भाजपला वरच्या सभागृहावर ताबा मिळवण्यापासून दूर ठेवण्यासाठी जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा निर्धार केला आहे; तर जे डी एस ने लढत असलेल्या सर्व सहा जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
कौन्सिलमध्ये बहुमत मिळवण्याच्या उद्देशाने, राज्याचे भाजपचे बलवान नेते आणि माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी प्रादेशिक पक्ष ज्या जागांवर निवडणूक लढवत नाहीत अशा जागांवर भाजपच्या उमेदवारांना जेडी(एस) चा पाठिंबा मागितला होता.
तथापि, सत्ताधारी भाजपशी संभाव्य कराराच्या चर्चा दरम्यान, जेडी(एस) नेते एचडी कुमारस्वामी यांनी अलीकडेच सांगितले की, त्यांचा पक्ष ज्या जागांवर लढत नाही त्या जागांवर कोणाला पाठिंबा द्यायचा प्रश्नच येत नाही. निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक नेत्यांना देण्यात आला आहे. 2023 च्या विधानसभा निवडणुकीची आणि पुढील सत्ताकारणा ची ही निवडणूक नांदी ठरणार आहे.
विजापूर, बेळगाव, धारवाड, दक्षिण कन्नड आणि म्हैसूर या स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून प्रत्येकी दोन जागांसाठी निवडणूक झाली आहे. बिदर, गुलबर्गा, उत्तर कन्नड, रायचूर, बेल्लारी, चित्रदुर्ग, शिवमोग्गा, चिकमंगळूर, हसन, तुमाकुरू, मंड्या, बंगळुरू, बंगलोर ग्रामीण, कोलार आणि कोडागु येथील प्रत्येकी एक जागेसाठी ही निवडणूक झाली आहे. आता लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे.