छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना ही क्षुल्लक गोष्ट असून अशा क्षुल्लक गोष्टीसाठी दगडफेक करणे चुकीचे असल्याचे मत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या पद्धतीने संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान असणाऱ्या शिवाजीराजांच्या पुतळ्यांची विटंबना करणार्यांवर त्वरित कारवाई करण्याऐवजी ही गोष्ट क्षुल्लक असल्याचे सांगत त्यांनी शिवप्रेमींच्या जखमेवर मीठ चोळले आहे, अशा प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत.
बेंगलोर येथे छ. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर सीमाभागासह महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. मात्र पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्याऐवजी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांनी पुतळ्याची विटंबना एक क्षुल्लक गोष्ट असल्याचे वक्तव्य केले असून शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याची सूचना देण्यात आल्या आहेत, असे म्हंटले आहे. यावरून बेळगावातील मराठी भाषिकांत तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
बेळगावमध्ये घडलेल्या दगडफेक घटनेचा मी निषेध करतो. तसेच कोणीही कायदा व सुव्यवस्थेला धक्का पोहोचण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईचे आदेश गृहमंत्र्यांना दिले असून त्यांनी अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या आहेत. तसेच छोट्या-मोठ्या कारणासाठी कायदा हातात घेऊन खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तेची हानी करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाईचे आदेश बजावले असून कोणत्याही कारणाने असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही.
यासंदर्भात गृहमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. घडल्या प्रकाराची सखोल चौकशी केली जाईल व प्रकरणाची पाळेमुळे खणून काढली जातील. खऱ्या देशभक्तांची ओळख पुढील पिढीला करून देण्याचा उद्देश असतो. त्याची विटंबना करणाऱ्यांचा तपास केला जाईल. योग्य ती कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्पष्ट केले.