मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या माध्यमातून समितीचे नेतृत्व सांभाळणारे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते दीपक दळवी यांच्यावर झालेली शाही फेक आणि त्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न यामुळे समस्त सीमाभाग सध्या भडकला आहे.
सीमाप्रश्नसाठी तन मन धन अर्पण करून लढणाऱ्या दळवी यांच्याबद्दल सीमाभागात प्रेम आहे. अशा नेत्याला काळे फासण्याचा प्रयत्न झाल्यामुळे सीमा भागातील जनतेने चीड व्यक्त केली असून या पुढील काळात त्याचे पडसाद संपूर्ण सीमाभागात दिसून येणार आहेत.
दीपक दळवी यांनी महाराष्ट्र एकीकरण समितीमध्ये एक साधा कार्यकर्ता म्हणूनच प्रवेश केला असला तरी अतिशय कमी काळात ते नेते म्हणून उदयास आले .शहर महाराष्ट्र एकिकरण समितीच्या माध्यमातून काम करत असताना अनेक मोठमोठ्या आंदोलनांमध्ये त्यांनी सहभाग घेतला.
मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत असताना सीमाप्रश्नाच्या खटल्यात मनापासून कामकाज पाहणारे नेते म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे .आपल्या सवंगड्यांना हाताशी धरून दिल्ली मुंबई आणि इतर सर्व ठिकाणी सातत्याने पुढे राहून सीमाप्रश्नाच्या खटल्यात सीमावासियांच्या बाजू प्रखरपणे मांडण्याचे प्रयत्न दीपक दळवी वारंवार करत आले आहेत.
अशा वेळी अशा नेत्यावर झालेला हल्ला हा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्वच नेते कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून याबद्दल पोलीस प्रशासनाला लागलीच जाब विचारण्याचे धाडस समितीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी दाखवले आहे.
समितीसाठी मुंबई दौरा सायकल फेरी असो किंवा इतर अनेक लढायांमध्ये सर्वात पुढे थांबणाऱ्या दीपक दळवी यांना झालेला हा काळी फासण्याचा प्रयत्न या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
कर्नाटक सरकारच्या पोलिसांनी कन्नड संघटनांना हाताशी धरून हे कृत्य मुद्दामहून करून घेतले असण्याची शक्यता निर्माण झाली असून यामुळे पोलिसांबद्दलही आक्रोश व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर त्या गुंडांवर कठोरातील कठोर कारवाई करून पोलिसांनी आपल्यावरचा रोष दूर करण्याची गरज आहे.