रस्त्यावरील स्पीड ब्रेकरमुळे गवत भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवरून पडून उचगाव येथील एक शेतकरी ठार झाल्याची घटना काल गुरुवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली.
अपघातात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नांव अनिल विष्णू जाधव (वय 55, रा. उचगाव) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनिल जाधव हे ट्रॅक्टर घेऊन गवत आणण्यासाठी येळ्ळूर येथे गेले होते.
ट्रॅक्टरमध्ये गवत भरून माघारी येत असताना सुळगा येथे रस्त्यावरील स्पीड ब्रेकरच्या धक्क्याने ट्रॅक्टरवर बसलेले जाधव रस्त्यावर पडले.
त्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी बेळगावला नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. मयत अनिल जाधव यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि आई -वडील असा परिवार आहे.