बेंगलोर येथील शिवरायांच्या पुतळा विटंबनेचा निषेध करत आज सकाळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या रणरागिनींनी पोलिसांची दडपशाही झुगारून शहापूर शिवाजी उद्यानातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून पूजन व नमन केले.
सदाशिनगर बेंगलोर येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे आज तीव्र निषेध करण्यात आला. तसेच महिला आघाडीच्या अध्यक्ष माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली माजी महापौर सरिता पाटील, माजी नगरसेविका मधुश्री पुजारी, सुधा भातकांडे आदी रणरागिनी आज सकाळी शहापूर शिवाजी उद्यान येथे छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यासाठी दाखल झाल्या. पोलिसांनी त्यांना उद्यानाच्या प्रवेशद्वारावरच रोखून आत जाण्यास मज्जाव केला. त्यावेळी उभयतांमध्ये शाब्दिक चकमक उडाली.
महिला आघाडीच्या रणरागिनी उद्यानातील छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्याच्या निर्णयावर ठाम राहताना छत्रपती शिवाजी महाराजां मुळेच आज महिला सुरक्षित असल्याचे सांगून पोलीस अधिकार्यांना चांगलेच सुनावले. त्यामुळे अखेर पोलिस अधिकाऱ्यांनी नमते घेऊन त्यांना उद्यानात प्रवेश दिला.
उद्यानामध्ये महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, माजी नगरसेविका मधुश्री पुजारी व सुधा भातकांडे यांनी तेथील सिंहासनारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिषेक घालून पूजन केले.
यावेळी शिवरायांचा जयजयकार करण्यात येत होता. त्याचप्रमाणे त्यानंतर हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा देत समितीच्या रणरागिनी पोलिसांसमक्ष उद्यानाबाहेर पडल्या. याप्रसंगी समिती कार्यकर्ते आणि शिवप्रेमींनी उद्यानाच्या प्रवेशद्वाराबाहेर गर्दी केली होती.