ऑटोरिक्षातून आलेल्या अती मद्यप्राशन केलेल्या युवकांच्या एका टोळक्याने शहरातील सम्राट अशोक चौक येथे मारामारी करून धिंगाणा घातल्याची आणि या युवकांना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या पोलिसांपैकी एक पोलीस उपनिरीक्षक जखमी झाल्याची घटना काल रविवारी रात्री घडली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, काल रविवारी रात्री उशिरा मद्यप्राशन करून ऑटो रिक्षातून (केए 22 डी 4157) आलेले काही युवकांनी रामलिंग खिंड गल्लीतील सम्राट अशोक चौकामध्ये धिंगाणा घालत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या पोलिसांना मिळताच ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
त्याच वेळी मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आपली ड्युटी संपवून घरी निघाले होते. सम्राट अशोक चौकातील गोंधळ पाहून युवकांना ताब्यात घेण्यासाठी ते गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या मदतीला धावून गेले.
त्यावेळी झालेल्या झटापटीत एका युवकाच्या हातातील चाकू लागून ते जखमी झाले. अखेर संबंधित तीनही मद्यपी युवकांना ताब्यात घेऊन चौकशीसाठी खडेबाजार पोलीस स्थानकात घेऊन जाण्यात आले. पोलिसांनी ऑटो रिक्षासह एक मोटरसायकल ताब्यात घेतली आहे.