बेळगावात होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालण्याऐवजी रस्त्याच्या दुभाजकावर असलेली रंगबिरंगी मनमोहक फुलझाडे उखडून टाकण्याचा संतापजनक प्रकार सध्या तिसऱ्या रेल्वे गेट ते पिरनवाडीपर्यंतच्या रस्त्यावर पहावयास मिळत आहे. जनतेने शहर विकासासाठी दिलेल्या पैशाचा या पद्धतीने चुराडा केला जात असल्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या नांवाने नागरिकात बोटे मोडली जात आहेत.
टिळकवाडीतील तिसऱ्या रेल्वे गेटपासून उद्यमबाग मार्गे पिरनवाडीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करून तो प्रशस्त दुपदरी करण्यात आला. त्यानंतर उद्यमबाग येथील उद्योजक आणि नागरिकांचा पुढाकार तसेच पाठपुराव्यामुळे सदर रस्त्याच्या दुभाजकावर तिसरा गेटपासून पिरनवाडीपर्यंत शोभेच्या फुलांची झाडे लावण्यात आली. कांही वर्षापूर्वी जीआयटी महाविद्यालयातील एका खास कार्यक्रमाला तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आले होते, त्यावेळी ही झाडांची रोपे लावण्यात आली होती. त्यानंतर अल्पावधीत ही फुलझाडे बहरून सदर रस्त्याच्या सौंदर्यात मोठी भर पडली होती. सदर रंगीबिरंगी फुलझाडांमुळे या रस्त्यावरून ये-जा करताना प्रत्येकाचे मन उल्हासित होत होते. हे बहुदा न पहावल यामुळे की काय कोणास ठाऊक? परंतु लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाची आता या फुलझाडांवर वक्रदृष्टी पडली आहे.
सध्या तिसऱ्या रेल्वे गेटपासून उद्यमबाग मार्गे पिरनवाडीपर्यंतच्या रस्त्याच्या दुभाजकावरील फुलांनी बहरलेली झाडे उखडून टाकण्यात येत आहेत. यासाठी चक्क जेसीबीचा वापर करण्यात येत आहे. सदर प्रकार उद्यमबाग येथील सुप्रसिद्ध उद्योजक आप्पासाहेब गुरव यांच्या निदर्शनास येताच त्यांनी फुलझाडे उखडण्यास विरोध करून जाब विचारला. गुरव यांनी धारेवर धरताच थातुरमातुर उत्तर देणाऱ्या संबंधित कंत्राटदार व कामगारांनी ठीक आहे तुम्ही सांगता तर काम बंद करतो, असे सांगून झाडे काढून टाकण्याचे काम बंद केले. परंतु गुरव यांची पाठ फिरताच पुन्हा दुभाजकावरील झाडे उखडून टाकण्याचा प्रकार सुरू झाला आहे.
रस्त्याची शोभा वाढवून परिसराच्या सौंदर्यात भर घालणारी फुलझाडे उखडून टाकण्याच्या या प्रकारामुळे या मार्गावरील उद्योजक, व्यावसायिक आणि नागरिकांसह ये -जा करणाऱ्या वाहनचालकांमध्ये तीव्र नापसंती व्यक्त होत आहे. अलीकडे बेळगाव शहरात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल होत असल्यामुळे पर्यावरण संरक्षणाची गरज निर्माण झाली आहे. ही छोटी छोटी शोभेची फुलझाडे देखील पर्यावरणाचा एक भाग आहेत. त्यामुळे ती काढून टाकले म्हणजे पर्यावरणाला क्षती पोहोचविण्यासारखेच आहे.
याखेरीज शहराच्या विकास कामांसाठी नागरिक सरकारला कर भरत असतात. या जनतेच्या पैशातूनच सदर फुलझाडे लावण्यात आली आहेत. त्यामुळे ही झाडे नष्ट करणे म्हणजे जनतेच्या पैशाचा चुराडा करण्यासारखेच आहे, अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
तसेच या प्रकाराला लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला जबाबदार धरून लाखोल्या वाहिल्या जात आहेत. विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनासाठी जर हा प्रकार सुरू असेल तर तो अत्यंत चुकीचा असून सदर प्रकार तात्काळ थांबवावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.