कर्नाटक सरकार सारख्या एका प्रचंड ताकदीच्या विरोधात आम्ही मराठी भाषिक लढत आहोत. यासाठी सामान्य मराठी माणसाचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आज देखील विरोध झुगारुन मराठी भाषिकांनी हा महामेळावा यशस्वी केलेला आहे, असे उद्गार मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी काढले.
भ्याड हल्ला करून कन्नड गुंडांनी काळे फासले असतानादेखील घडल्या प्रकाराला फारसे महत्त्व न देता दीपक दळवी नेहमीप्रमाणे आपल्या खंबीर नेतृत्वाची झलक दाखविताना आज व्हॅक्सिन डेपो मैदानावरील महामेळाव्यात बोलत होते. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांकडून दीपक दळवी आगे बढो हम तुम्हारे साथ है! ही घोषणा देण्यात येत होती. मी तुमच्या साऱ्यांचा ऋणी कसा व्हावा त्याच्याबद्दल माझ्याकडे शब्द नाहीत. या मेळाव्यासाठी काल संध्याकाळपासून आम्ही या मैदानावर आहोत.
यादरम्यान वेगवेगळ्या संकल्पना मांडण्यात आल्या. आम्हाला एकच काम करायचे आहे जे आम्ही अनेक वर्ष करत आहोत. एका प्रचंड ताकदीच्या विरोधात आम्ही सामान्य माणसं लढत आहोत. या सामान्य माणसांचे कौतुक करावे तितके थोडे आहे. आज अनेक अडचणींना तोंड देत आपण येथे उभे आहोत, असे दळवी पुढे म्हणाले.
आज सकाळपासून महापालिका अधिकारी आणि पोलिस अधिकारी मराठी भाषिकांचा हा महामेळावा कसा बेकायदेशीर आहे हे सांगत आहेत. मेळाव्यापर्यंत लोक पोहोचू नयेत म्हणून पोलीस अडचण निर्माण करत आहेत. तथापि सर्व विरोध झुगारून आज मराठी भाषिकांनी हा महामेळावा यशस्वी केला आहे, असे दीपक दळवी यांनी सांगितले. तेंव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे! रहेंगे तो महाराष्ट्र मे, नही तो जेल मे! नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी! या घोषणा देऊन हॅक्सीन डेपो मैदान दणाणून सोडले होते.
पोलिसांकडून चर्चा करायची आहे असे सांगून दिपक दळवी यांना बाजूला नेण्यात आले. त्यानंतर कन्नड गुंडांनी दळवी यांच्यावर भ्याड हल्ला करून त्यांना काळे फासले. यावरून पोलीस व गुंडांनी संगनमताने जाणीवपूर्वक हे कृत्य केल्याचे स्पष्ट होते. प्रशासनही त्या गुंडांसोबत काम करत आहे, असा स्पष्ट आरोप एका वक्त्याने केला. तसेच जे काळे आहेत त्यांनी काळे फासले. हिंमत असेल तर त्यांनी खुल्या मैदानात यावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
त्याचप्रमाणे काळे फासनाच्या घटनेच्या निषेधार्थ उद्या बेळगाव व खानापूर बंद आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रात देखील बंदची हाक दिली जावी. दिल्लीत संसदेचे अधिवेशन सुरू आहे. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या खासदारांनी सभात्याग करून बेळगावातील या घटनेचा निषेध नोंदवावा, असे मतही आजच्या महामेळाव्याप्रसंगी संबंधित वक्त्याने व्यक्त केले.