गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे बेळगाव तालुक्यातील शेतकरीवर्गाची भात कापणी व मळणीसाठी एकच धांदल उडाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांची कापणी -मळणी एकाच वेळी सुरू झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे.
यंदा संपूर्ण नोव्हेंबर व डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस झाल्याने तब्बल सव्वा महिना भात कापणीमध्ये व्यत्यय निर्माण झाला होता. पाऊस कधी थांबणार याची वाट पाहण्यातच शेतकऱ्यांचे दिवस गेले होते. आता पाऊस कमी होऊन उघडीप झाल्याने शेतकरी वर्ग पुन्हा भात कापणी व मळणीमध्ये गुंतला आहे. ट्रॅक्टर बरोबरच भात मळणी मशीनच्या सहाय्याने केली जात आहे.
बहुतांश शेतकऱ्यांची कापणी -मळणी एकाच वेळी सुरू झाल्याने मजुरांची कमतरता भासत आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व मंडळी भात वाळवणी आणि मळणीच्या कामात व्यस्त झालेली पहावयास मिळत आहेत. अलीकडे झालेल्या पावसात अनेक शेतकऱ्यांच्या भात मळण्या अडकल्या होत्या. पावसामध्ये भात भिजून गेले होते.
सद्यस्थितीला अवकाळी पाऊस गायब झाल्याने ऊन पडत असून भात पीक वाळविण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे. परिणामी पावसापासून झालेल्या नुकसानीतून बचावलेल्या पिकाची सुगी साधण्यात शेतकरी गुंतला आहे. अलीकडे दहा-पंधरा वर्षात ट्रॅक्टरद्वारे मळणी करण्याची पद्धत सुरू झाली आहे त्याचप्रमाणे गत दोन-तीन वर्षापासून भात मळणी करण्याची यंत्रे उपलब्ध झाली आहेत.
पूर्वी जनावरांच्या सहाय्याने भात मळणी करण्यात येत होती. शक्यतो सदर मळणी रात्रीच्यावेळीच केली जात होती. अलीकडे जनावरे कमी झाल्याने ट्रॅक्टरद्वारे मळणी करण्यात येत आहे. त्यामुळे जनावरांच्या सहाय्याने होणारी मळणी आता दुर्मिळ झाली आहे.