कोरोनाची संभाव्य तिसरी लाट व ओमिक्राॅनच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधितांच्या प्रथम संपर्कातील (प्रायमरी कॉन्टॅक्ट) व्यक्तींची पहिल्याच दिवशी कोरोना चांचणी करण्याचा आदेश आरोग्य विभागाने बजावला असून गेल्या 22 डिसेंबर रोजी हा आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पाठविण्यात आला आहे.
एखादी कोरोना बाधित व्यक्ती सापडली तर सर्वात आधी त्या व्यक्तीच्या प्रथम संपर्कात (प्रायमरी कॉन्टॅक्ट) आलेल्यांची यादी करून त्याच दिवशी त्यांची कोरोना चांचणी करावी आणि 7 दिवस त्यांना काॅरन्टाईन करावे व आठव्या दिवशी पुन्हा चांचणी करावी असेही आदेशात नमूद आहे.
याखेरीज कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम युद्धपातळीवर केले जावे शहर व ग्रामीण भागात यासाठी विशेष कर्मचारी नियुक्त करावेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगनंतर संबंधिताला होम काॅरन्टाईन करण्याची जबाबदारी देखील कांही कर्मचाऱ्यांकडे द्यावी.
कॉन्टॅक्ट रेसिंग व काॅरन्टाईनसाठी स्वतंत्र मोबाईल ॲप तयार केले असून त्यांचा वापर करावा. सध्या कोरोनाशी संबंधित जबाबदारी ज्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडे आहे त्यांनीच हे काम पुढे सुरू ठेवावे, अशी सूचनाही आदेशाद्वारे देण्यात आली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाचे मुख्य सचिव टी. के. अनिलकुमार यांनी हा आदेश बजावला आहे.
कोरोनाची तिसरी लाट व ओमिक्रॉनला थोपविण्यासाठी जिल्हाधिकारी आणि आरोग्य विभागाने कोणती जबाबदारी पार पाडावी हे आदेशात नमूद आहे. सध्या राज्यात दररोज सरासरी 300 कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत. तथापि ओमिक्रॉनचा संसर्ग वेगाने वाढत असल्याचे आरोग्य खात्याच्या सचिवांनी आदेशात म्हंटले आहे.