कर्नाटक विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले जात आहे. त्यासाठी रात्री उशिरापर्यंत स्वच्छता कर्मचाऱ्यांना राबवून घेतले जात असले तरी त्यांच्या पोटापाण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचे निदर्शनास येताच एका नगरसेविकेने स्वखर्चाने संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांची जेवणाची व्यवस्था केल्याची घटना नुकतीच घडली.
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने एकीकडे मंत्री, आमदार -खासदार या लोकप्रतिनिधींसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची चांगली बडदास्त ठेवली जात असताना दुसरीकडे रात्री 12 -1 वाजेपर्यंत काम करून शहर स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणाऱ्या स्वच्छता कामगारांवर मात्र उपासमारीची वेळ येत असल्याचा खेदजनक प्रकार शहरात निदर्शनास येत आहे. याबाबतची माहिती अशी की, प्रभाग क्रमांक 10 च्या नगरसेविका वैशाली भातकांडे या आपले पती सिद्धार्थ यांच्यासमवेत काल मंगळवारी रात्री जेवणानंतर फिरावयास बाहेर पडल्या होत्या.
त्यावेळी हुतात्मा चौक कावेरी कोल्ड्रिंक हाऊसनजीक महापालिकेचे काही स्वच्छता कर्मचारी गटारांची साफसफाई करताना त्यांच्या निदर्शनास आले. इतक्या उशिरा काम करत असल्याबद्दल नगरसेविका भातकांडे यांनी माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्यांच्याकडे चौकशी करून विचारपूस केली असता. कंत्राटदाराने त्यांना कामाला लावून त्यांची पोटापाण्याचीही व्यवस्था केली नसल्याचे भातकांडे यांच्या निदर्शनास आले.
तेव्हा नगरसेविका वैशाली भातखंडे यांनी लागलीच आपले पती सिद्धार्थ भातकांडे यांना सांगून संबंधित स्वच्छता कर्मचाऱ्यांची नजीकच्या हॉटेलमध्ये जेवणाची व्यवस्था केली. या पद्धतीने आपली विचारपूस करून जेवणाची व्यवस्था केल्याबद्दल ते स्वच्छता कर्मचारी नगरसेविका वैशाली भातखंडे व सिद्धार्थ यांना दुवा देताना दिसत होते.