बेळगाव शहर परिसरात कालपासून कडाक्याची थंडी पडू लागली आहे. आज सकाळपासून हवेतील गारठा आणखी वाढला असून पारा 11.8 सेल्सिअस इतका खाली घसरला आहे.
बेळगाव शहर परिसरातील थंडीमध्ये गेल्या कांही दिवसापासून सातत्याने वाढ होत आहे. सध्या शहर परिसराचे कमाल तापमान 26.6 सेल्सियस इतके आहे. तथापि कालपासून थंडीत कमालीची वाढ झाल्यामुळे पारा घसरू लागला असून काल 13.2 सेल्सियस इतके असणारे शहराचे तापमान आज 11.8 सेल्सियस इतके झाले आहे.
या पद्धतीने पारा बराच खाली घसरल्यामुळे दुपारी 12 वाजले तरी हवेतील गारठा कायम होता. थंडीची लाट आल्यामुळे नागरिकांना घरातील ठेवणीतील गरम कपडे बाहेर काढावे लागले आहेत. त्याचप्रमाणे बाजारपेठेत स्वेटर, जॅकेट व गरम कानटोप्या यांच्या मागणीत वाढ झाली आहे. थंडीच्या कडाक्यामुळे उपनगरांसह ग्रामीण भागातील मंडळी शेकोट्या पेटवून थंडीपासून संरक्षण मिळवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
हवेतील गारठा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वयोवृद्ध मंडळींनी आज घराची दारे खिडक्या लावून घरातच राहणे पसंत केले. तसेच कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांच्या अंगावर स्वेटर, जॅकेट आदी गरम कपडे पहावयास मिळत होते. दरम्यान सध्या शहर परिसराचे तापमान 11.8 सेल्सियस इतके असले तरी ते आणखी घसरण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.