बेळगाव महानगरपालिकेच्या नव्या आयनॉक्स इमारतीचे उद्घाटन आणि रेल्वे स्थानकासमोरील हायटेक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला.
महापालिकेच्या सुभाषनगर येथील मुख्य कार्यालयाच्या आवारातच नवी प्रशासकीय आयनॉक्स इमारत बांधण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन वर्षभराचा कालावधी लोटण्यास आला होता. संसदेच्या इमारतीच्या धर्तीवर बांधण्यात आलेल्या या इमारतीसमोर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा आहे.
या इमारतीत महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सत्ताधारी व विरोधी गटनेते, महापालिकेशी संबंधित आमदारांचे कक्ष असणार आहेत. सदर इमारतीचा लोकार्पण सोहळा आज सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या हस्ते पार पडला.
त्याचप्रमाणे बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील पूर्वीच्या गोवा बसस्टँडच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या हायटेक बसस्थानकाचा लोकार्पण सोहळा देखील मुख्यमंत्री बोम्मई यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महापालिकेची आयनॉक्स इमारत, अत्याधुनिक क्रीडा संकुल आणि महिला क्रीडा वस्तीगृह तसेच रेल्वे स्थानकासमोरील हायटेक बस स्थानक या तिन्ही विकासकामांबद्दल प्रशंसोद्गार काढले. नगरविकास मंत्री बैराती बसवराज यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ॲड. अनिल बेनके यांच्यासह शहरातील दोन्ही आमदारांनी उत्तम कामगिरी बजावली आहे असेही ते म्हणाले.
तसेच या पद्धतीने सर्व विकासकामे निर्धारित वेळेत उत्तम रीतीने पार पाडण्यासाठी आपले सरकार कटिबद्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.याप्रसंगी नगरविकास मंत्री बैराती बसवराज, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके, दक्षिणचे आमदार तसेच अन्य गणमान्य उपस्थित होते.