व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळावा घेण्यास परवानगी देण्यात आली नसल्यामुळे शेजारील रस्त्यावर मंडप घालून महामेळावा घेण्याचा प्रयत्न करणार्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर महानगरपालिकेतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात महानगरपालिकेच्या अभियंता मंजुश्री यांनी फिर्याद दिली असून आयोजनात सहभागी असणाऱ्या सर्व प्रमुख नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे .महाराष्ट्र एकीकरण समितीने डेपो मैदान येथे महामेळावा आयोजित करण्याच्या संदर्भात परवानगी मागितली होती.
मात्र महानगरपालिकेने पोलीस दलाच्या सूचनेनंतर परवानगी देण्यात येईल अशी भूमिका घेतली होती.तसे पत्र आपण दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. मात्र हे पत्र समिती नेत्यांकडे पोहोचलेच नाही असा दावा समिती नेत्यांनी केला आहे.
.आपण पत्र दिले होते असा महानगरपालिकेच्या अभियंत्यांचा दावा आहे. त्यामुळे वादावादी झाली, याचे पर्यावसान म्हणून मेळाव्याचा मंडपच उखडून टाकण्याचा प्रयत्न महानगर पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने केला मात्र समिती नेते ठाण मांडून राहिल्यामुळे मनपाला असे करता आले नाही.
याचा राग आता पोलीस फिर्यादीच्या माध्यमातून व्यक्त झाला असून समिती नेत्यांना आणखी एक केसचा सामना करावा लागणार आहे.