बेळगावात मोठ्या प्रमाणात हिंसाचार उसळला असून त्यामुळे महाराष्ट्रात उमटलेल्या प्रतिक्रियांवर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
महाराष्ट्रात राहणाऱ्या कन्नड लोकांचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे, असे सांगत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच दोन्ही राज्यांचे पोलिस महासंचालक एकमेकाशी चर्चा करणार आहेत.
बंगळूर येथील सदाशिवनगरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सीमाभाग आणि महाराष्ट्रात उमटले आहेत.
बंगळूर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली. त्याचे पडसाद बेळगावात उमटले. या घटनेची प्रतिक्रिया म्हणून क्रांतीवीर संगोळी रायण्णा यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली.
हिंसक जमावाने पोलिसांच्या गाड्या तसेच इतर सरकारी वाहनांची तोडफोड केली. कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातील सांगली शहर, मिरज, जत, इस्लामपूर, विटा येथे व पुणे शहरात कर्नाटक राज्य परिवहन सेवेच्या बसेस तसेच खासगी वाहनांची तोडफोड केली.
कोल्हापुरात कर्नाटकी व्यावसायिकांच्या दुकानांवर दगडफेक केली. या घटनेची दखल घेत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी नाराजी व्यक्त केली. आता महाराष्ट्रातील कन्नड माणसांच्या संरक्षणासाठी कर्नाटकाचे मुख्यमंत्री बैठक घेत असतील तर त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी कर्नाटकातील मराठी माणसाच्या संरक्षणासाठी आग्रही राहावे अशी सीमावासियांची मागणी आहे.