बेळगाव शहरात 16.50 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक क्रीडा उपकरणांनी सुसज्ज नूतन क्रीडासंकुलाचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी सायंकाळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आणि राज्याचे क्रीडा मंत्री डॉ. के. व्ही. नारायणगौडा यांच्या हस्ते पार पडला.
शहरातील नेहरूनगर येथील 2 एकर 14 गुंठे जागेमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे इनडोअर स्टेडीयम आणि महिला क्रीडावस्तीगृह असणारे सर्व सुविधांनी सुसज्ज नूतन क्रीडा संकुल उभारण्यात आले आहे. या ठिकाणी कुस्ती, ज्युडो, हॉलीबॉल अथलेटिक्स आणि सायकलिंग या खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इनडोअर स्टेडियममध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची उपकरणे असलेले जिम्नॅशियम, कुस्तीचे रिंग, ज्युडो हॉल आदी अन्य सुविधा उपलब्ध असणार आहेत.
या ठिकाणी महिला क्रीडापटूंसाठी 2.19 कोटी रुपये खर्च करून वसतिगृह उभारण्यात आले आहे. जिल्ह्यातील क्रीडापटूंसाठी आवश्यक सर्व सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देऊन त्यांना प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेला हा क्रीडा संकुलाचा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करून त्याचे आज त्याचे लोकार्पण करण्यात आले.
बेळगाव जिल्ह्याने अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडापटू दिले आहेत. या भागातून आणखी दर्जेदार क्रीडापटू निर्माण व्हावेत या उद्देशाने या क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे. राज्यातील क्रीडा क्षेत्राचा दर्जा अधिक उंचवावा यासाठी सरकारने विविध योजना आखल्या असून त्याची अंमलबजावणी केली जात आहे असे यावेळी बोलताना क्रीडा मंत्री डॉ नारायणगौडा यांनी सांगितले.
तसेच सदर क्रीडा संकुल आणि महिला क्रीडा वसतिगृह निर्मितीसाठी केंद्राकडून अनुदान मंजूर करून घेण्यात दिवंगत केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचा सिंहाचा वाटा असल्याचेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी नगरविकास मंत्री बैराती बसवराज, जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके आदी मान्यवर उपस्थित होते.