कर्नाटक रक्षण वेदिकेच्या गुंडांनी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्या तोंडाला काळे फासण्याचे केलेले ते कृत्य कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला काळीमा पासून गेले आहे.
शांत आणि संयमी मार्गाने लोकशाहीच्या नियमांचा अवलंब करीत आयोजित करण्यात आलेल्या महामेळाव्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न करताना कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनाला गालबोट लावून शांतता भंग करण्याचा प्रकार या रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी केला असून यामुळे बेळगाव आणि सीमाभागातील वातावरण पुन्हा एकदा बिघडले आहे.तसेच मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या पोलिसांच्या दुटप्पी कारभारामुळे कायदा आणि सुव्यवस्था अडचणीत आली आहे.
या मेळाव्याला परवानगी दिलेली नाही असे कारण दाखवून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मंडप हटवण्याचा प्रयत्न सुरू केला होता. तरीही महामेळावा घेणारच अशी भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीने लावून धरली होती. यावेळी चर्चेसाठी म्हणून काही पोलिस अधिकाऱ्यांनी दीपक दळवी यांना बाजूला बोलावले होते.
बाजूला जाऊन येत असताना कन्नड गुंडांनी त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांच्या अंगावर काळी शाई ओतली त्यामुळे प्रचंड संताप व्यक्त झाला आहे. समितीने या विरोधात उद्या मंगळवारी संपूर्ण सीमाभाग बंदचे आवाहन केले आहे. अधिवेशन सुरू असताना सीमाभाग बंद ठेवला जाणे ही कर्नाटक सरकारची नाचक्की आहे. शांतता आणि संयम या मार्गातून आंदोलन केले जात असताना नसते प्रकार करून अधिवेशनात गालबोट लावण्याचा प्रकार करण्यात आला असून यात कर्नाटकाची पोलिस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कोणत्याही बाजूने नागरिक जास्तीत जास्त संख्येने दाखल होऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता .पोलिसांनी बॅरिकेड्स लावून नाकेबंदी केली होती.
अशा वेळी ते कन्नड रक्षण वेदिकेचे कार्यकर्ते या मेळाव्याच्या ठिकाणी कसे पोचले ?यामुळे त्याला पोलिस प्रशासनाचे अपयशच कारणीभूत आहे की प्रशासनाने त्यांना दिलेली मदत हा चर्चेचा विषय ठरला आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. बेळगावचे पोलीस आयुक्त उपायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांनी त्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांना सहकार्य केले ही पोलिसांची आणि त्या कार्यकर्त्यांची मीलीभगत होती की ते येतील आणि अशाप्रकारे हल्ला करतील ही माहिती पोलिसांना मिळाली नाही. या संपूर्ण गोष्टीचा तपास होण्याची गरज निर्माण झाली आहे. हिवाळी अधिवेशनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणारे ते कार्यकर्ते आणि त्याला जबाबदार सर्व घटकांवर चौकशी करून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी टिळकवाडी पोलीस स्थानकात दाखल होऊन संबंधितांवर फिर्याद दाखल केली आहे .आता कर्नाटकचे पोलिस त्यांना अभय देतात की कारवाई करतात त्यावरून पुढील भवितव्य ठरणार असून कर्नाटक सरकारची याबद्दलची भूमिका काय हा प्रश्न सध्या गंभीर बनला आहे.