तिबार पीक देणाऱ्या सुपीक जमिनीतील हलगा -मच्छे बायपास रस्त्याचा प्रकल्प तात्काळ रद्द करावा अन्यथा या रस्त्याच्या विरोधात राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिला आहे.
शहरात काल गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी गिळंकृत करण्याचा डाव राज्य सरकारने आखला आहे. मात्र तो कदापिही यशस्वी होऊ देणार नाही.
हलगा -मच्छे बायपास रस्त्याच्या स्थगितीसाठी शेतकरी बांधवांच्यावतीने आंदोलन सुरू आहे. मात्र प्रकल्प पूर्णपणे रद्दबादल करण्यात यावा यासाठी सरकारला जागृत करण्यात येणार आहे. याकरता राज्य रयत संघटनेच्या माध्यमातून प्रभावी आंदोलन छेडण्यात येणार आहे, असे चंद्रशेखर यांनी सांगितले.
बायपास रस्त्याची कोणतीही अधिकृत योजना नाही. त्याचप्रमाणे यासाठी झिरो पॉइंट निश्चित करण्यात आलेला नाही. या विरोधात येथील शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे, तर न्यायालयाने यावर स्थगिती दिली आहे. परंतु याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून काम सुरूच ठेवण्यात आले आहे.
याच्या विरोधात शेतकऱ्यांच्यावतीने आता आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्यात येणार आहे. यासाठी विविध शेतकरी संघटनांच्यावतीने येत्या हिवाळी अधिवेशन काळात आंदोलन छेडण्यात येणार आहे, अशी माहितीही कोडीहळ्ळी चंद्रशेखर यांनी दिली. यावेळी राज्य संघटनेचे राजू मरवे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.