Thursday, December 26, 2024

/

ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकसाठी सुरु झाली धडपड!

 belgaum

बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये येत्या 13 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या अधिवेशनाचे औचित्य साधून शहरातील कणबर्गी येथील ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रकचे उद्घाटन करण्याच्या दृष्टीने सध्या युद्धपातळीवर या ट्रेकचे काम पूर्ण करण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. अशाप्रकारे अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक झाल्यास बेळगाव हे राज्यातील अशा प्रकारचा ट्रॅक असणाऱ्या प्रमुख शहरांपैकी एक असणार आहे.

सर्व क्षेत्रांचे आधुनिकीकरण होत असून त्या अनुषंगाने प्रगत देशांमध्ये आता वाहन चालन चांचणी अर्थात ड्रायव्हिंग टेस्ट देखील आधुनिक पद्धतीने घेतली जात आहे. यासाठी ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकचा अवलंब केला जात आहे. बेळगाव येथेही हा ट्रेक उभारण्यात येत असून आगामी हिवाळी अधिवेशन काळात त्याचे उद्घाटन केले जाणार आहे. यासाठी सदर ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक्टरचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. गेल्या तीन -चार वर्षापासून सदर अत्याधुनिक ट्रॅक व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असून सरकारकडून या प्रकल्पासाठी निधी देखील मंजूर झाला आहे. तथापि या ना त्या कारणास्तव सदर ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक उभारण्यात विलंब होत होता. मात्र आता विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सदर ट्रक उभारणीचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. या अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमुळे प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचे वाहन चालक परवाना देण्यापूर्वी प्रत्यक्ष मैदानावर उपस्थित वाहनचालकांची चाचणी घेण्याचे श्रम वाचणार आहेत.

सदर ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रेकखाली भूमिगत कॅमेरे व सेन्सर बसविण्यात येत असल्यामुळे वाहनधारकांची वाहन चालविण्याची चांचणी घेताना अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष ट्रॅकवर उपस्थित राहण्याची गरज भासणार नाही. ते आपल्या कार्यालयात बसल्याजागी ड्रायव्हिंगचे ऑडिओ -व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहू शकणार आहेत. वाहन चालक परवाना मिळवू इच्छिणाऱ्या उमेदवाराने टेस्ट ड्राईव्हच्या वेळी या ट्रॅकवर एखादी चूक केल्यास सेंसरद्वारे बीपच्या स्वरूपात अधिकार्‍यांना त्याची माहिती मिळणार आहे.Rto test kalkhamb

बीपसह चांचणी वेळी वाहनचालकाने कोठे कोठे चुका केल्या याची माहिती भूमिगत कॅमेरातील चित्रीकरणासह संग्रहित केली जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांना एखाद्याला वाहनचालक परवाना द्यायचा की नाही? हे ठरविणे अत्यंत सुलभ जाणार आहे. याखेरीज वाहन चालक परवाना देण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट घेणाऱ्या अधिकाऱ्यांना यापूर्वी ड्रायव्हिंग टेस्टच्या ठिकाणी मैदानावर दिवसभर थांबावे लागत होते.

हा त्रास वाचविण्यासाठी यामधून पळवाट काढताना चांचणी न घेताच परवाने दिले जात होते. या गैरकारभाराला या नव्या अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅकमुळे लगाम बसणार आहे. यापूर्वी सदर अत्याधुनिक ट्रॅक उभारणीसाठी 6 कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र आता कालांतराने या खर्चात वाढ झाली असून आता हा ट्रेक उभारणीसाठी 8 कोटी 23 लाख रुपये खर्च केले जाणार असल्याचे समजते. एकंदर हा अत्याधुनिक ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक बेळगावातील नवोदित वाहनचालकांसाठी कुतूहलाचा आणि औत्सुक्याचा विषय ठरणार हे मात्र निश्चित आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.