कोविडचा प्रसार, उत्तर किंवा दक्षिण कर्नाटक अशी काही कारण न देता बेळगावमध्ये हिवाळी अधिवेशन झालेच पाहिजे, असा आग्रह आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला आहे.
बेळगावमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अनेक विषयांवर आज चर्चा करण्यात आली. या पत्रकार परिषदेत आप चे विजय पाटील यांनी बोलताना सांगितले कि, उत्तर कर्नाटकात मोठ्या प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. कोविड नियमांचे पालन करून बेळगाव सुवर्ण विधानसौधमध्ये अधिवेशन भरविण्यात यावे,कोणतीही टाळाटाळ केली जाऊ नये.
बेळगाव मनपा निवडणुकीला तीन महिने पूर्ण झाले असून अद्यापही महापौर-उपमहापौर निवडणूक घेण्यात आली नाही. यामुळे बेळगावचा विकास खुंटला आहे. तातडीने मुख्यमंत्र्यांनी यासंबंधी निर्णय घेऊन महापौर-उपमहापौर निवडणूक जाहीर करावी, अशी मागणीही करण्यात आली .
यावेळी बोलताना एससीएसटी समाजाचे नेते सुदर्शन शिंदे म्हणाले, स्मार्ट सिटी योजनेंतर्गत हाती घेण्यात आलेली कामे अद्यापही अपूर्ण आहेत. यापैकी किती कामे पूर्ण झाली आहेत आणि किती अपूर्ण आहेत याचा हिशोब करून प्रलंबित अनुदान वापरून, नवीन बजेट हाती घेणे आवश्यक आहे. वैज्ञानिक कामकाजासंबंधी तज्ञ समितीची स्थापना करण्याची गरज आहे.
या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीचे नेते एस वाय कलारकोप्प, अब्दुल शेख, इम्रान सय्यद, नवमान खानापूर, परशुराम आदींसह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.अधिवेशन आणि महापौर निवडणूक या दोन मुद्यांवर या पत्रकार परिषदेत भर देण्यात आला होता.