काही कारणाने पतीचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर ती अधिकच खंबीर झाली. आपल्या दोन मुलांना घेऊन पतीचा व्यवसाय पुढे घेऊन जाण्याचे ध्येय तिने बाळगले होते. अशातच एके दिवशी निदान झाले तिला कर्करोग झाला आहे. घरच्यांसाठी हा सर्वात मोठा धक्का होता.
अतिशय हसत-खेळत जगणाऱ्या तिला प्रचंड वेदना सहन कराव्या लागत होत्या. वेगवेगळे उपचार झाले, अनेक प्रयत्न झाले, मात्र जगण्याची प्रचंड उमेद असणारी ती अचानक निघून गेली. मात्र तिला वृक्ष रुपाने सदैव अस्तित्वात ठेवण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला आणि म्हणूनच अंत्यसंस्कारानंतर उरलेल्या तिच्या राखेतून वृक्ष लावण्यात आले असून जल प्रदूषण टाळण्या बरोबरच तिला सदैव सचेतन पाहण्याचा निर्णय तिच्या कुटुंबीयांनी घेतला आहे .
बांधकाम व्यावसायिक विजय पाटील यांचे लहान बंधु कै. गजाजन यांची पत्नी कै. गंगा गजानन पाटील असे त्यांचे नाव .पती गजानन पाटील यांचे निधन झाल्यानंतर अतिशय खंबीरपणे वाटचाल करीत असताना दुर्दैवाने कर्करोगाची लागण झाल्याने त्यांना जावे लागले. त्यांच्या निधनानंतर मुलांना आणि एकंदर कुटुंबियांना झालेला शोक अनावर होताच, तरीही सारेजण सावरले. त्यांच्या जाण्याला एक नवा अर्थ प्राप्त करून देण्याचा निर्णय या पाटील कुटुंबीयांनी घेतला
.गुरुवारी रक्षाभरणी झाल्यानंतर त्यांच्या अस्थींचे नदीच्या पाण्यात विसर्जन करण्यात आले. मात्र राख विसर्जित करून जलप्रदूषण करण्यापेक्षा याच पाटील कुटुंबियांच्या वतीने चालवल्या जात असलेल्या शांताई वृद्धाश्रमात झाडांची रोपे लावून तिची राख या झाडांमध्ये घालण्यात आली. आता या राखेच्या माध्यमातून ती झाडे उंच उंच भरारी घेतील आणि कुटुंबियांना सातत्याने आपल्या घरची गंगा अस्तित्वात असल्याचे सुख मिळत राहील.
यासंदर्भात कै. गंगा यांचे मोठे दीर यांचे बांधकाम व्यावसायिक विजय पाटील यांनी माहिती दिली. पाटोदा चे सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्याकडून आपण हा वसा घेतला आहे. भास्कर राव यांची आई १०५ वर्षाची असताना गेल्यानंतर त्यांनी ही तिच्या राखेचे विसर्जन न करता त्या राखेत झाडे लावण्याचा निर्णय घेतला .हा निर्णय खरोखरच योग्य आहे. त्यामुळेच पाटील कुटुंबीयांनी त्यांच्या पाऊलवाटेवर चालण्याचा प्रयत्न केला असून इतरांनी यासाठी पुढे यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
खरेतर कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा नाही. मात्र प्रसिद्धी तुन जास्तीत जास्त लोक जल प्रदूषणा पासून बाजूला येतील आणि वाहत्या पाण्यात मिसळलेल्या राखेचा नदी ,तलाव आणि माणसांवर दुष्परिणाम सोसावा लागण्यापेक्षा ते पाणी शुद्ध राहील. त्या राखेचे खत होऊन झाडे जगतील आणि मयत व्यक्ती कायम अस्तित्वात असल्याचा आनंद मिळवता येईल असे त्यांनी सांगितले.