निपाणी शहर आणि तालुक्यातील ग्रामीण भागात घरफोड्या होत
असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. बेडकिहाळ येथे एक बंद घर फोडून चोरटयांनी ४० हजार रुपये रोख आणि ११ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवले.
बेडकिहाळमधील रामनगरातील गरीब महिला लक्ष्मीबाई कोरव यांच्या घरी चोरटयांनी डल्ला मारला. त्या पेरू विकून आपला चरितार्थ चालवितात. त्यामुळे सकाळी एकदा बाहेर पडल्या की, संध्याकाळीच घरी परततात.
हीच संधी साधून त्या घरी नसताना चोरटयांनी हात साफ केला आहे. घराची कौले काढून आत प्रवेश करून चोरटयांनी ४० हजार रुपये रोख आणि ११ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने लांबवून फरारी झाले आहेत.
उन्हातान्हात वणवण फिरून पेरू विकून जमवलेले कष्टाचे ४० हजार आणि ११ ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याने लक्ष्मीबाई याना मोठा धक्का बसला आहे. सदलगा पोलीस ठाण्याचे पीएसआय रवींद्र अज्जनावर यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केले. याबाबत अधिक तपास सुरु आहे.