घरगुती गॅस सिलेंडरवर सबसिडी देण्यास कर्नाटकात सुरुवात झाल्याची माहिती पेट्रोलियम मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. शहरातील आरटीआय कार्यकर्ता लखन चव्हाण याने यासंदर्भात माहिती अधिकाराखाली विचारणा केली होती. शिवाय बीपीसीएल कंपनीकडे विचारणा केली असतात 23 नोव्हेंबरपासून सबसिडी देण्यास सुरुवात झाल्याचे सांगण्यात आले आहे.
कंपनीने सबसिडी देण्यास सुरुवात झाल्याची माहिती दिली असली तरी गॅस वितरकांकडे चौकशी केली असता त्या संदर्भात कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सबसिडी देण्यास सुरुवात झाली तर ती जानेवारी किंवा मार्च पासून होईल. सध्या सबसिडीबाबत कार्यवाहीचा कोणताही आदेश आलेला नाही असेही गॅस वितरकांकडून सांगण्यात आले आहे. अन्न व नागरी पुरवठा विभागालाही याबाबत शासनाचा लेखी आदेश मिळालेला नाही.
तथापि जानेवारीपासून सबसिडी पुन्हा सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती देण्यात आली. कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे गेल्या मे 2020 पासून घरगुती गॅस सिलेंडरवरील सबसिडी देणे बंद झाले आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे सबसिडी पुन्हा सुरू व्हावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, सबसिडी देण्यास सुरुवात होईल असे पेट्रोलियम कंपन्या व गॅस वितरकांचे म्हणणे आहे. तथापि बीपीसीएल कंपनीच्या मते कर्नाटकात 23 नोव्हेंबरपासून सबसिडी दिली जात आहे. यासंदर्भात कंपनीच्या सहाय्य वाणीवर झालेल्या संवादाची ऑडिओ क्लिप लखन चव्हाण याच्याकडे उपलब्ध आहे. त्यावर कंपनीच्या महिला प्रतिनिधीनेच सबसिडी सुरू झाली आहे असे स्पष्टपणे सांगितल्याचे ऐकावयास मिळते.