कॅम्प येथील सेंटपॉल्स स्कूलतर्फे आयोजित 54 व्या फादर एडी स्मृती चषक आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेतील रोमहर्षक अंतिम लढतीत सेंटपॉल्स शाळेने सेंट झेवियर्स शाळेचा पेनाल्टी शुटआऊटवर 4-2 असा पराभव करून फादर एडी चषक हस्तगत केला.
सेंट पॉल्स होस्टेल मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून बेनेडिक्ट मेनीस यांची निवड करण्यात आली. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गोलरक्षक हा पुरस्कार कुंदन जाधव (महिला विद्यालय) याला आणि सर्वाधिक गोलचा पुरस्कार शिनान सावनूर (सेंट पॉल्स) व रेहान किल्लेदार (सेंट झेवियर्स) यांना देण्यात आला.
अंतिम लढतीत सेंट पॉल्स शाळेने प्रतिस्पर्धी सेंट झेवियर्सचा 4–2 अशा गोलफरकाने पराभव केला. विजयी सेंट पॉल संघाच्या शिनान सावनूर, कौस्तूभ आंबेकर, आबिदा स्वामी, नवाल शेखसराफ यांनी, तर पराभूत सेंट झेवियर्स संघातर्फे रेहान किल्लेदार व ऋषिकेश गोधवाणी यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
स्पर्धेच्या बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डचे सीईओ के. आनंद, कॅन्टोन्मेंट बोर्डचे माजी सदस्य साजिद शेख, सेंटपॉल्स शाळेचे फादर प्राचार्य सावियो अब्रु, उपप्राचार्य सबेस्टियन परेरा, शाळेचे व्यवस्थापक रोनी
डिसोजा, मुख्याध्यापिका रूपा चडचील, रायस्टीन जेम्स, स्पर्धा सचिव अँथनी डिसोजा, निता तुक्कार, संतोष शाहु आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्याला पंच म्हणून अमीन पिरजादे, शुभम झेंडे, अभिषेक चेरेकर, विष्णू दावणेकर आणि व्यंकटेश नाईक यांनी काम पाहिले.