Wednesday, December 25, 2024

/

रहदारी पोलीस ‘या’ बेकायदा ट्रक पार्किंगकडे लक्ष देतील का?

 belgaum

बेळगाव शहरानजीकच्या राकसकोप रस्त्यावर बेन्नाळीच्या पुढे महिन्यातून चार -पाच दिवस रस्त्याच्या एका बाजूला मोठ्या संख्येने मालवाहू ट्रक पार्क करण्यात येत असल्यामुळे वाहतुकीस अडथळा होण्याबरोबरच येथील स्वराज्य कॉलनीमधील रहिवाशांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे.

शहरानजीकच्या राकसकोप रस्त्यावर फुड कार्पोरेशन ऑफ इंडियाचे (एफसीआय) गोडाऊन आहे. याठिकाणी अन्नधान्य अर्थात राशन भरून घेण्यासाठी शहरासह जिल्ह्यातील विविध भागातून मालवाहू ट्रक येत असतात. या एफसीआय गोडाऊननजीक स्वराज्य कॉलनी ही नागरी वसाहत आहे. गोडाउनमध्ये माल भरून घेण्यासाठी येणाऱ्या ट्रक गाड्यांसाठी गोडावूनचे प्रवेशद्वार सकाळी 8 -8:30 ला उघडण्यात येते. त्यामुळे माल भरून घेण्यासाठी आदल्या दिवशी सायंकाळी 4 वाजल्यापासून राकसकोप मार्गावर बेन्नाळीच्या पुढे नंबर लावून एका बाजूला रांगेने ट्रक पार्क केले जातात.

दरमहा आठवड्यातील चार -पाच दिवस राकसकोप रस्त्यावर बेन्नाळीच्या पुढे रस्त्याच्या एका बाजूला या पद्धतीने ट्रकचे बेकायदेशीररित्या लांबच्या लांब पार्किंग झालेले असते. परिणामी या ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण तर होतोच मात्र गांभीर्याची बाब ही की स्वराज्य कॉलनीमधील वाहनधारक रहिवाशांसाठी हे पार्किंग धोकादायक ठरत आहे. कॉलनीतून आपली वाहने घेऊन बाहेर पडणाऱ्या नागरिकांना दोन्ही अंगाला पार्क केलेल्या ट्रक गाड्यांच्या पलीकडे राकसकोप मुख्य रस्त्यावर ये-जा करणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही.Benkanhalli

त्यामुळे कॉलनीच्या रस्त्यावरून एकदम मुख्य रस्त्यावर आपली वाहने घेऊन येताना नागरिकांना जीव मुठीत धरावा लागत आहे. कांहीजण तर थोडक्यात अपघातातून बचावले आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या या ट्रक पार्किंगच्या समस्येमुळे स्वराज्य कॉलनीतील वाहन चालक विशेषकरून दुचाकी वाहन चालक त्रस्त झाले आहेत. पार्किंगसंदर्भात ट्रक चालकांना जाब विचारल्यास अथवा समजावण्यास गेल्यास ते आम्हीपण रोड टॅक्स भरतो अशी अरेरावीची भाषा करून वाद घालतात.

तरी लोकप्रतिनिधींसह रहदारी पोलीस विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन एफसीआय गोडाउनमध्ये माल भरून घेण्यास येणाऱ्या ट्रक गाड्यांसाठी पार्किंगची पर्यायी सोय करावी अथवा स्वराज्य कॉलनीच्या रस्त्यापर्यंत पार्क करण्यात येणाऱ्या ट्रकच्या चालकांना कॉलनीतील वाहनचालकांना मुख्य रस्त्यावरील दोन्ही बाजूनी येणारी वाहने दिसू शकतील या पद्धतीने थोड्या दूरवर ट्रक पार्क करण्यास सांगावेत, अशी जोरदार मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.