धोबीपछाड मारून बेळगावचा महापौर झालेला ‘शिवाजी’ आजच्या भाषणात मला परत दिसला, असे उस्फुर्त उद्गार महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी काढले.
तालुका समितीच्या दोन्ही गटामध्ये एकी करण्यासंदर्भात बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची महत्वपूर्ण बैठक आज दुपारी पार पडली. या बैठकीप्रसंगी घर वापसी करणाऱ्या माजी महापौर शिवाजी सुंठकर यांच्यासंदर्भात दीपक दळवी बोलत होते.
भारतीय जनता पक्षाला रामराम ठोकणारे माजी महापौर शिवाजी सुंठकर पुन्हा महाराष्ट्र एकीकरण समितीकडे परतले आहेत. त्यांनी आजच्या बैठकीला आवर्जून हजेरी लावताना आपले परखड विचार व्यक्त केले.
त्यांचे समितीमध्ये पुन्हा स्वागत करताना दीपक दळवी यांनी सुंठकर महापौर झाल्यानंतर धोबीपछाड मारून शिवाजी सुंठकर महापौर झाले, असे मी म्हणालो होतो. त्यानंतर खासबाग रयत गल्ली येथील एका सभेसाठी आम्ही दोघे गेलो होतो. असे सांगून त्या आठवणी आज जाग्या झाल्या आणि त्यावेळचा धोबीपछाड मारणारा शिवाजी आजच्या त्याच्या भाषणात मला परत दिसला, असे दळवी म्हणाले.
माजी महापौर शिवाजी सुंठकर यांची आजची बैठकीतील उपस्थिती सार्यांचे लक्ष वेधून घेत होती. त्याचप्रमाणे सुंठकर यांच्या ‘घर वापसी’मुळे समितीचे नेते मंडळींसह उपस्थितांमध्ये समाधान व्यक्त होताना दिसत होते.