शिवाजीनगर पहिली गल्ली पहिला मेन क्रॉस येथील फुटलेली मुख्य ड्रेनेज पाईपलाईन स्थानिक नूतन नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांच्या पुढाकाराने दुरुस्त करण्यात आल्यामुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे.
शहरातील शिवाजीनगर पहिली गल्ली पहिला मेन क्रॉस येथील नाल्याला जोडलेली मुख्य ड्रेनेज पाईपलाईन दिल्या दोन वर्षांपूर्वी फुटली होती. परिणामी पाण्याचा निचरा न होता सांडपाणी नाल्यात तुंबून परिसरात दुर्गंधीचे वातावरण पसरत होते. ड्रेनेज पाईप लाईन फुटल्यामुळे या भागातील घराघरातील सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा होत नव्हता.
त्याचप्रमाणे बऱ्याचदा विशेष करून पावसाळ्यात घाण सांडपाणी मैल्यासह माघारी जाऊन आसपासच्या अनेक घरांमधील शौचालयांमधून बाहेर पडत होते. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता. त्याचप्रमाणे या प्रकारामुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले होते.
सदर फुटलेल्या ड्रेनेज पाईपलाईन संदर्भात वारंवार तक्रार करून देखील गेल्या दोन वर्षात त्याची दखल घेण्यात आली नव्हती. तथापी शिवाजीनगर प्रभाग क्र. 14 चे नूतन नगरसेवक शिवाजी मंडळोकर यांनी निवडून येताच याबाबत पाठपुरावा सुरू केला होता.
अखेर त्यांच्या प्रयत्नामुळे आज मंगळवारी संबंधित फुटलेली मुख्य ड्रेनेज पाईपलाईन दुरुस्त करण्यात आली. फुटलेले पाईप काढून त्या ठिकाणी नवे पाईप बसविण्यात आले. नगरसेवक मंडोळकर यांनी केलेल्या या कार्याबद्दल स्थानिक नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.यावेळी विजय पवार, यल्लाप्पा खांडेकर उपस्थित होते.