इंधन करावरील कपात करून केंद्र आणि राज्य सरकारने वाहन चालकांना काही प्रमाणात दिलासा दिला असला तरी यावेळी पेट्रोल पंप चालकांना मात्र लाखोंचा फटका बसला आहे.
जुन्या दराने घेतलेले पेट्रोल आणि डिझेल आता नवीन कपातीच्या दराने विकावे लागत असल्यामुळे अनेक पेट्रोलपंप चालक अडचणीत आले असल्याची माहिती मिळाली आहे.
लक्षावधी रुपयांचा फटका बसला असून त्यामुळे पेट्रोल पंप चालकांची अवस्था बिकट बनली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
बेळगाव शहरात पेट्रोल आणि डिझेलचे दर महाराष्ट्राच्या तुलनेत अतिशय कमी झाले असल्यामुळे सीमा भागातून ही खरेदीचा ओघ वाढला आहे. त्यामुळे पेट्रोल पंप वर गर्दी दिसून येत असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र गर्दी आता होत असली तरी जुन्या दराने घेतलेले पेट्रोल आणि डिझेल नव्या कमी दराने विकावे लागत असल्यामुळे पेट्रोल पंप चालकांवर वाईट परिस्थिती आली आहे.
एका पेट्रोल पंप चालकाने नाव न सांगण्याच्या अटीवर बेळगाव लाईव्ह ला ही माहिती दिली आहे. बेळगाव शहरात पेट्रोल आणि डिझेल चा खप मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सध्या खप वाढला आहे.
गर्दीचे वातावरण असले तरी अनेक पेट्रोल पंप चालकांना जुन्या दराने विकत घेतलेले पेट्रोल पहिला विकावे लागत असून ते नवीन दराने विकावे लागत आहे. त्यामुळे पेट्रोल पंप चालकांची अवस्था बिकट असल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण काही पेट्रोल पंप चालक इंधन दर वाढल्यावर काही वेळा जुन्या दराने विकत घेतलेले पेट्रोल नवीन दराने विकतात त्यामुळे त्यावेळी फायदा होत नाही का ?असा प्रश्न त्यांना विचारला असता तो फायदा पैशांमध्ये असतो मात्र आता दहा ते अकरा रुपयेच्या पेक्षा जास्त दर कपात झाली असल्यामुळे लिटरमागे मोठे नुकसान होत असून 20 ते 30 हजार लिटर पेट्रोल शिल्लक असलेल्या पेट्रोल पंप चालकांना मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. जितका कोटा शिल्लक तितका तोटा असे समीकरण बनले आहे असे त्यांनी सांगितले.