नवी दिल्ली येथे आज शनिवारी झालेला सय्यद मुश्ताक अली करंडक 2021 -22 क्रिकेट स्पर्धेचा कर्नाटक आणि विदर्भ यांच्यातील दुसरा उपांत्य फेरीचा सामना निडगल खानापूर -बेळगावच्या रोहन कदम याने गाजविला.
सलामीवीर रोहन याने कर्नाटक संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलताना झंझावती फलंदाजी करत 56 चेंडूत शानदार 87 धावा झळकाविल्या.
सय्यद मुश्ताक अली करंडक 2021 -22 क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठताना आज शनिवारी झालेल्या उपांत्य सामन्यात कर्नाटक संघाने प्रतिस्पर्धी विदर्भ संघालाचा 4 धावांनी पराभूत केले. नवी दिल्ली येथे आज झालेल्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात विदर्भ संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला.
या संधीचा पुरेपूर लाभ उठविताना कर्नाटक संघाने मर्यादित 20 षटकात 7 गडी बाद 176 धावा जमविल्या. रोहन कदम आणि मनीष पांडे या त्यांच्या सलामीचे जोडीने प्रारंभापासूनच आक्रमक पवित्रा घेताना संघाला 135 धावांची सलामी दिली. जेंव्हा रोहन डीप स्क्वेअर लेगवर झेलबाद झाला. प्रतिस्पर्धी गोलंदाजीवर हल्ला चढवून चौफेर फटकेबाजी करणाऱ्या रोहन कदम याने 56 चेंडूंचा सामना करताना 7 चौकार आणि 4 षटकारांसह 87 धावा झळकविल्या.
रोहनला समर्थ साथ देणारा मनीष पांडे (54 धावा) संघाच्या 167 धावसंख्येवर झेलबाद होताच कर्नाटकचा डाव घसरला आणि त्यांना मर्यादित 20 षटकांत 7 बाद 176 धावा काढता आल्या. प्रत्युत्तरादाखल विदर्भ संघाला मर्यादित 20 षटकात 6 गडी बाद 172 धावा काढता आल्या.
आज सामना समाप्त होताच कर्नाटक संघातील रोहन कदम यांच्या सहकार्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. आता कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यामध्ये येत्या सोमवारी स्पर्धेचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे.