केएलई संस्थेच्या राजा लखनगौडा विज्ञान (आर.एल.एस.) महाविद्यालयाच्या मोहम्मद कैफ या विद्यार्थ्याने नीट परीक्षेमध्ये देशात 384 वा क्रमांक पटकाविला आहे. एवढेच नाही तर या महाविद्यालयाच्या तब्बल 20 विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा उत्तीर्ण होऊन अभिमानास्पद कामगिरी केली आहे.
राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. आर. एल. एस. महाविद्यालयाच्या मोहम्मद कैफ याने या परीक्षेत 720 पैकी 691 गुण संपादन करून देशात 384 वा क्रमांक ओबीसी गटात देशात 88 वा क्रमांक मिळविला आहे.
कैफ प्रमाणे याच महाविद्यालयातील विद्यार्थी तरूण कमलगुड्ड आणि सोहम चिपरे हे 720 पैकी 532 गुण संपादन करून चांगल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. या तीनही गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयांच्या प्राचार्यांच्या हस्ते आज पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी प्राचार्य प्रा. विश्वनाथ कामगोळ यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच आरएलएस महाविद्यालयाचे 20 विद्यार्थी यंदाच्या नीट परीक्षेत यशस्वी झाल्याची माहिती त्यांनी दिली.