सार्वजनिक बांधकाम खात्याने पिरनवाडी नाका ते विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठापर्यंतच्या (व्हीटीयु) रस्ता रुंदीकरणाच्या हालचालींना सुरुवात केली आहे. व्हीटीयुपासून कांही अंतरावर रस्त्याच्या दुतर्फा जेसीबी लावून सपाटीकरण करण्यात आले असून तूर्तास काम बंद असले तरी लवकरच ते पुनश्च सुरू होणार आहे.
गेल्या कांही दिवसांपूर्वी भेट देऊ ते पिरनवाडीपर्यंतच्या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. रुंदीकरणाचा निर्णय घेण्यापूर्वी गावातील लोकांना विश्वासात घेणे गरजेचे होते. मात्र तसे न करता सार्वजनिक बांधकाम खात्याने रस्ता कामाचे पूजन केले होते. तसेच लवकरच कामाला सुरुवात सुरुवात होणार असून हा रस्ता 140 फूट रुंद करण्याची योजना असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र त्यामुळे पिरनवाडी ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होऊन व्यापारी व दुकानदारांसह सर्वांनीच या रुंदीकरणाला विरोध केला. या रुंदीकरणाच्या विरोधात या भागातील व्यापाऱ्यांनी एक दिवस बंद देखील पाळला होता.
पिरनवाडी येथील दुकानदार, व्यापारी व नागरिकांनी बांधकाम खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन 140 ऐवजी 70 फूट रुंदीचा रस्ता करण्याची मागणी केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी 140 एवजी 110 फुटाचा रस्ता करण्याबाबत विचार केला जाईल, असे सांगितले होते. रस्ता 110 फुट रुंद केल्यास दोन्ही बाजूची सर्व दुकाने काढावी लागणार आहेत. तसेच रस्त्याला लागून असलेल्या अनेक घरांचे नुकसान होणार आहे.
त्यामुळे व्यापारी व रहिवाशांची चिंता वाढली आहे. अशातच आता व्हीटीयुपासून ठिकठिकाणी स्वच्छता करण्यासह कांही ठिकाणी सपाटीकरण करण्यात आल्याने सर्वांची धास्ती वाढली आहे. लोकांचे नुकसान टाळण्यासाठी रस्त्याची रुंदी करीत कमी करण्याची मागणी होत आहे.
पिरनवाडीतील रस्ता 110 रुंद करण्यास तीव्र विरोध करण्यासंदर्भात व्यापक बैठक घेऊन पुढील रूपरेषा ठरविण्याचा निर्णय ग्रामस्थांनी आहे, शिवाय गरज पडल्यास न्यायालयीन लढा देण्याचाही त्यांचा विचार आहे.