हालगा -मच्छे बायपास रस्त्यांमुळे शहरातील फिश मार्केट येथील झिरो पॉईंट हालगा येथे हलविण्यात आला असल्याची माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पिकाऊ सुपीक जमिनीतून निर्माण करण्यात येत असलेल्या हालगा -मच्छे बायपास रस्त्याला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. यासाठी शेतकरी आक्रमक झाले असून वातावरण तणावग्रस्त बनले आहे. अशोक अनगोळकर या शेतकऱ्याने आत्मदहनाचा प्रयत्न केल्यामुळे वातावरण अधिकच चिघळले आहे. सध्या बायपासचा ठिकाणी प्रचंड पोलीस फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर बायपासच्या ठिकाणी प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या एका अधिकाऱ्याने हालगा -मच्छे बायपास रस्त्यांमुळे शहरातील फिश मार्केट येथील झिरो पॉईंट हालगा येथे हलविण्यात आला असल्याची माहिती दिली. बेळगाव नजीकचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आता रद्द करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 नुसार झिरो पॉईंट बेळगाव शहरातील फिश मार्केट येथे येत होता.
मात्र आता नव्या राष्ट्रीय महामार्गानुसार बेळगाव शहरासाठी असणाऱ्या हालगा -मच्छे बायपास रस्त्यामुळे झिरो पॉईंट हालगा येथे हलविण्यात आला आहे. यासंदर्भात सरकारचे सर्व नोटिफिकेशन झाले आहे आणि त्यामुळे सरकार बायपाससाठी भू-संपादनाची प्रक्रिया करत आहे असे सांगून पूर्वीच्या आणि आताच्या सर्वेक्षणांमध्ये कांहीही फरक नाही. नियमानुसार सरकारच्या आदेशाप्रमाणे आम्ही काम हाती घेतले आहे, असेही संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
तुम्ही तुमची सोय पाहत आहात बायपाससाठी तुम्ही झिरो पॉइंट फिश मार्केट येथून हलवून हालगा येथे आणलात. मात्र हे करताना शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे याचा विचार तुम्ही केला नाहीत का? असा सवाल यावेळी पत्रकारांनी केला.
त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या त्या अधिकाऱ्याने हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारा त्यांनी आम्हाला परवानगी दिली आहे. त्यानुसार आम्ही काम करत आहोत असे सांगून शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाची जबाबदारी झटकली.