Saturday, January 25, 2025

/

राज्यात लाॅक डाऊन नाही! : आरोग्य मंत्र्यांचे स्पष्टीकरण

 belgaum

नव्या कोरोना विषाणू व्हेरिएंटच्या धोक्यामुळे राज्यात पुन्हा लाॅक डाऊन जारी करण्याची शक्यता कर्नाटकच्या आरोग्यमंत्र्यांनी फेटाळून लावली आहे. सरकारने राज्यात लाॅक डाऊन जारी करण्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे, असे आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी आज सोमवारी स्पष्ट केले आहे.

‘ओमिक्राॅन’ या कोरोना विषाणूच्या नव्या व्हेरिएंटमुळे कर्नाटकात लाॅक डाऊन जारी करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तविली जात असल्यामुळे आरोग्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण केले. राज्य सरकारसमोर राज्यात लाॅक डाऊन जारी करण्याबाबत कोणताही प्रस्ताव नाही आणि लोकांनी त्या संदर्भात अफवा पसरवू नयेत, असे आवाहन करून ओमिक्राॅन जेथे प्रथम आढळून आला त्या दक्षिण आफ्रिकेतून राज्यात आलेल्या सर्व प्रवाशांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे. प्रवाशांचे सर्वेक्षण करून त्यांच्या संपर्कातील लोकांना शोधले जात आहे, अशी माहिती सुधाकर यांनी दिली.

राज्यात लाॅक डाऊन लादण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. सोशल मीडिया अर्थात समाज माध्यमातून यासंदर्भात खोट्या बातम्या पसरविल्या जात आहेत. राज्याची तांत्रिक सल्लागार समिती आणि डॉक्टरांची बैठक घेऊन कोरोना संदर्भातील खबरदारीच्या भावी मार्गदर्शक सूचीबाबत चर्चा केली जाईल. आम्ही तणाव निर्माण होईल असे कांहीही करणार नाही.

 belgaum

मात्र समाज माध्यमांद्वारे खोट्या बातम्या पसरवू नयेत. कोरोना महामारीमुळे अनेकांनी यापूर्वीच खूप कांही भोगलं आहे. तेंव्हा भीतीचे वातावरण पसरले जाऊ नये. लोकांनी अवश्य खबरदारी घेऊन कोरोना नियमांचे पालन करण्याद्वारे विषाणूपासून स्वतःला सुरक्षित ठेवावे, असे आवाहनही आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी केले.Sudhakar

कर्नाटक सरकारने आज सोमवारी राज्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवासी अर्थात विदेशी प्रवाशांसाठी नवी मार्गदर्शक सूची जारी केली आहे. आरोग्य खात्याकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नुसार जोखीम असलेल्या 12 देशातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना आगमन होताच आरटी -पीसीआर चांचणी करून घ्यावी लागेल. याखेरीज त्यांच्यासाठी 7 दिवसांचे घरगुती विलगीकरण अनिवार्य असेल आणि 8 व्या दिवशी त्यांना पुनर्रचांचणी द्यावी लागेल.

दरम्यान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज सोमवारी कोरोना चांचणीचे निगेटिव्ह प्रमाणपत्र असलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांनीच फक्त विमानतळाबाहेर पडावे, असे स्पष्ट केले आहे. ओमिक्राॅन या कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटसाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) मार्गदर्शक सूचीचे पालन केले जावे. पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी देखील नव्या विषाणूच्या बाबतीत खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.