बेळगावच्या दोन जागांसाठी विधानपरिषद निवडणुक १० डिसेंबरला होणार आहे ही निवडणूक राजकीय संघर्षाचे व्यासपीठ बनली आहे. भाजपकडून महांतेश कवठगीमठ, काँग्रेसकडून चन्नराज हट्टीहोळी आणि अपक्ष उमेदवार म्हणून लखन जारकीहोळी उभे आहेत.
भाजपा आणि बंधू लखन यांच्यासाठी रमेश जारकीहोळी प्रचारासाठी जिल्हाभर धावत आहेत पिंजून काढत आहेत त्यामुळे ही निवडणूक अनेक राजकीय गणितांची साक्ष देणार आहे.
माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्यासाठी ही निवडणूक हा प्रतिष्ठेचा प्रश्न आहे. पहिल्या मताने आम्ही भाजपचा पराभव करणार असल्याचे सतीश जारकीहोळी यांनी जाहीर केले आहे. मात्र, भाजपमध्ये केवळ रमेश जारकीहोळी सक्रिय आहेत. मंत्री उमेश कत्ती, शशिकला जोल्ले आणि माजी उपमुख्यसमंत्री लक्ष्मण सवदी अद्याप सक्रिय झाले नाहीत.
रमेश यांनी भाऊ लखन याना निवडून आणण्यासाठी जोरदार रस्सीखेच सुरू केली आहे. अर्ज सादर करण्याच्या दिवशीच त्यांनी2000 हून अधिक ग्राम पंचायत सदस्यांना घेऊन नामांकन केलं. रमेश जारकीहोळी, भालचंद्र जारकीहोळी, लखन जारकीहोळी यांचा जिल्ह्यातील अनेक पंचायत सदस्यांशी थेट संपर्क आहे. याचा परिणाम निवडणुकीच्या निकालावर होणार आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर आणि केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांच्या बाजूने उभे आहेत. मतदारसंघाच्या चारही बाजूंनी प्रचार सभा घेत आहेत. पण ही राजकीयदृष्ट्या महत्त्वाची निवडणूक आहे. भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांच्या पराभव आणि विजयावर बरीच चर्चा होत असली तरी भाजप उमेदवार पराभूत झाल्यास ठपका रमेश जारकीहोळी यांच्यावर येणार आहे.
बेळगाव जिल्ह्यात भाजपचे 13 आमदार असून, भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमाठ यांना पहिल्या फेरीत विजय मिळविण्यासाठी सर्वच जण मनापासून मेहनत घेत आहेत.जारकीहोळी साठी एक गट कामाला लागला असल्याची चर्चा आहे.बेळगाव जिल्ह्य़ात भाजपच्या आमदारांची मोठी ताकद आहे, त्यांच्या मतदारसंघातील मतदार भाजपच्या उमेदवाराला मतदान करतात,की नाही? हे आता महत्त्वाचे आहे.
केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी काँग्रेसचे उमेदवार चन्नराज यांना विजयी करण्याची जबाबदारी घेतली आहे, लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यासोबत जिल्हाभर प्रचार सुरू केला आहे. सतीश जारकीहोळी यांच्यावर काँग्रेसची जबाबदारी असल्याने काँग्रेसचे उमेदवार चन्नराज यांना विजयी करण्यासाठी सतीश यांची धावपळ सुरू आहे.
सध्याची निवडणूक व्यवस्था ही पक्षांमधील निवडणूक नाही, ती सूडाची निवडणूक आहे, ती वैयक्तिक संघर्षाची असून हा अंतर्गत संघर्ष कोणाचा पराभव करतो, कोण जिंकतो.हे अद्याप स्पष्ट नाही.बेळगाव जिल्ह्य़ात निवडणुकीची रणधुमाळी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.