विधान परिषद निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेमध्ये कोणत्याही प्रकारची उणीव राहणार नाही याची खबरदारी अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी सक्त सूचना विधान परिषद निवडणुकीच्या निरीक्षक वरिष्ठ आयएएस अधिकारी एकरूप कौर यांनी केली.
बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज शुक्रवारी आयोजित विधान परिषद निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार तसेच कायद्याच्या चौकटीत ही निवडणूक पार पडेल याची सर्वांनी काळजी घ्यावी. अन्य निवडणुकीपेक्षा या निवडणुकीची मतमोजणी थोडी भिन्न असल्याने मतमोजणीसाठी अनुभवी अधिकार्यांची नियुक्ती केली जावी.
निवडणूक प्रक्रियेसंदर्भात संबंधित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जावे, असे निरीक्षक श्रीमती एकरूप कौर यांनी सांगितले. तसेच आचारसहिता, प्रशिक्षण, मायक्रो ऑब्झर्वर नियोजन, निवडणूक प्रक्रिये दरम्यान घ्यावयाची खबरदारी आदींबाबत कौर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.
निवडणुकीच्या तयारीस संदर्भात जिल्हा मुख्य निवडणूक निर्वाचन अधिकारी तथा जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी जिल्ह्यात 511 मतदान केंद्रे स्थापण्यात आली असल्याचे सांगितले. तसेच मार्गदर्शक सूचीप्रमाणे सर्व सिद्धता करण्यात येत असून निवडणुकीसाठी नियुक्त व कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर मायक्रो ऑब्झर्वर नेमण्यात आला आहे, अशी माहिती दिली.
सर्व नोडल अधिकाऱ्यांसह पोलीस आयुक्त डाॅ. के. त्यागराजन, जि. पं. मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी, महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी, बेळगाव उपविभागीय अधिकारी रवींद्र कर्लिंगनावर, कृषी खात्याचे महासंचालक शिवणगौडा पाटील, माहिती व प्रसिद्धी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडबूर आदी वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.