2020 -21 च्या सरकारी लेखा परीक्षणानुसार मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेला ऑडिट वर्ग ‘ए’ मिळाला असून बँकेला यावर्षी 2 कोटी 55 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे, अशी माहिती मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली.
मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेची एकूण 79 वी वार्षिक सर्वसाधारण सभा येत्या रविवार दि. 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता बोलवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर बँकेमध्ये आज शुक्रवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
चेअरमन दिगंबर पवार यांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार सन 2020 -21 साली बँकेच्या एकूण ठेवी 148 कोटी 96 लाख इतक्या आहेत. सभासदांच्या ठेवी सुरक्षिततेसाठी बँकेने 5 लाखापर्यंत विमा उतरविला आहे. ज्येष्ठ नागरिकांना ठेवीवर अर्धा टक्का जादा व्याजदर देण्यात येत आहे. बँकेचे एकूण कर्ज वितरण 102 कोटी 30 लाख रुपये इतके आहे. लेखा परीक्षणानुसार बँकेला ऑडिट वर्ग ‘ए’ मिळाला आहे त्याच प्रमाणे अहवाल साली बँकेने 2 कोटी 55 लाख 19 हजार 127 रुपये इतका निव्वळ नफा कमावला आहे. सामाजिक उपक्रम राबवत बँकेने आर्थिक दृष्ट्या अग्रक्रम क्षेत्रास 74.14 टक्के आणि दुर्बल घटकास 47.97 टक्के कर्जाचे वितरण केले आहे.
मराठा को-ऑपरेटिव बँकेची सभासद संख्या एकूण 12104 इतकी आहे. बँकेचे भाग भांडवल 2 कोटी 73 लाख 88 हजार 900 रुपये इतके आहे. रिझर्व व इतर फंड 59 कोटी 44 लाख 48 हजार 421 रुपये इतका आहे. त्याचप्रमाणे गुंतवणूक 105 कोटी 64 लाख 70 हजार 756 रुपये इतकी आहे. बँकेचे खेळते भांडवल 220 कोटी 43 लाख 39 हजार 552 रुपये इतके आहे.
‘ग्राहक देवो भव’ या उक्तीप्रमाणे बँकेने नेहमीच ग्राहक सेवेस प्राधान्य दिले असून चांगल्या ग्राहक सेवेकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब केलेला आहे. बँकेला मागील वर्षी सभासदांना लाभांश देता आला नव्हता. मात्र यावर्षी ‘अ’ वर्ग सभासदांना 20 टक्के आणि असोसिएट मेंबर्सना 6 टक्के लाभांश देण्याबाबत शिफारस करण्यात आली आहे. वयाची 55 वर्षे पूर्ण केलेल्या आणि सभासद होऊन 20 वर्षे झालेल्या सभासदांना वृद्धापकालीन सुविधा म्हणून 2500 रुपये सहकार्य निधी बँकेकडून दिला जात आहे. बँकेने चॅरिटी फंडातून परिसरातील अनेक शैक्षणिक संस्थांना भरीव आर्थिक सहाय्य केले आहे. तसेच बेळगाव परिसरातील सामाजिक व विधायक कार्यात बँकेने सहकार्य केलेले आहे, अशी माहितीही चेअरमन दिगंबर पवार यांनी दिली.
पत्रकार परिषदेस बँकेच्या व्हाईस चेअरमन निना काकतकर, संचालक बाळाराम पाटील, दीपक दळवी, बाबुराव पाटील लक्ष्मणराव होनगेकर, बाळासाहेब काकतकर, शेखर हंडे, विनोद हंगिरकर, सुशीलकुमार खोकाटे, सुनील अष्टेकर, रेणू किल्लेकर, मोहन चौगुले आदी संचालक मंडळ यांच्यासह बँकेचे जनरल मॅनेजर गजानन हिशोबकर व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.