गावठी पिस्तूल विकणाऱ्या आंतरराज्य टोळीला गजाआड करण्यात खानापुर पोलिसांना यश आले असून पोलिसांनी त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. याप्रकरणी एका रौडीशीटरसह 8 जणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
गावठी पिस्तुल विक्रीच्या आंतराज्य अवैध व्यवसायाचा भांडाफोड करण्यात बेळगाव जिल्हा पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणी आंतरराज्य टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून 2 गावठी पिस्तूल आणि 3 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. चोरट्या मार्गाने मध्यप्रदेशातून बेळगावात गावठी पिस्तूल आणून कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांमध्ये त्यांची विक्री केली जात होती. प्रत्येकी 1 लाख रुपये इतक्या दराने ही गावठी पिस्तुले विकली जात होती. गेल्या 5 नोव्हेंबर रोजी खानापूरचे पोलीस निरीक्षक शिंगे हे रात्रीच्या गस्तीवर असताना त्यांना संशयास्पदरित्या फिरणारे गावठी पिस्तुलांची विक्री करणाऱ्या टोळीचे सदस्य हाती लागले. खानापूर पोलिसांनी त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूल आणि तीन काडतुसे जप्त केली आहेत.
या प्रकरणी कर्नाटकातील 5 महाराष्ट्रातील 3 आणि मध्य प्रदेशातील 2 जण अशा एकूण 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी एका रौडीशीटरसह 8 जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. धारवाड जिल्ह्यातील आणि गिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रौडीशीटर उमेश याचा यात समावेश आहे. लोकांना पिस्तुलाची भीती दाखवून लूटमार करता यावी यासाठी उमेश गावठी पिस्तूल खरेदी करण्यासाठी आला होता, अशी माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे. याशिवाय महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील तुळशीदास जोशी हा मध्य प्रदेशातील आरोपींकडून गावठी पिस्तूल खरेदी करून त्यांची विक्री कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोव्यात करीत होता असे पोलिस चौकशीत उघडकीस आले आहे.
तुळशीदासला गावठी पिस्तूल पुरवणारा मध्यप्रदेशातील वर्ना जिल्ह्यातील विजय रामलाल ठाकूर यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
या प्रकरणातील मध्य प्रदेशातील मुख्य आरोपी फरारी झाला असून त्याचा शोध सुरू आहे. यासंदर्भात बेळगाव जिल्हा पोलीस प्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी अधिक माहिती दिली आहे. एकंदर पोलिसांच्या डोळ्यात धूळफेक करून गावठी पिस्तूल विक्रीचा अवैध धंदा करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या मुसक्या आवळण्यात बेळगाव पोलिसांना यश आले असून त्यांच्यावर खानापुर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.