Thursday, December 26, 2024

/

जिल्ह्यातील ‘या’ वीर जवानाला मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’

 belgaum

जम्मू -काश्मीर येथील अनंतनाग जिल्ह्यात गेल्या 27 नोव्हेंबर 2018 रोजी जीवाची पर्वा न करता दोघा दहशतवाद्यांचा खात्मा करून शहीद झालेल्या बुदिहाळ (ता. निपाणी) जवान प्रकाश जाधव यांना मरणोत्तर ‘कीर्ती चक्र’ हा दुसरा सर्वोच्च शौर्य पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हुतात्मा जवान प्रकाश जाधव यांच्या वीरपत्नी नीता उर्फ राणी जाधव आणि वीर माता शारदा जाधव यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

गेल्या 27 नोव्हेंबर 2018 रोजी रेडबनीबाला (जि. अनंतनाग) गावामध्ये जवानांनी दहशतवाद्यांची शोधमोहीम हाती घेतली होती. जवान प्रकाश जाधव हे आपल्या साथीदारांच्या मदतीने पहाटे 3:30 च्या सुमारास एका घरात घुसले असता घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रकाश जाधव यांनी जिवाची पर्वा न करता साथीदारांना मागे ढकलत एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. त्याच वेळी दुसऱ्या दहशतवाद्याने पेट्रोल बॉम्ब फेकला. सावध होत जाधव यांनी साथीदारांना घरातून बाहेर पडण्याची सूचना केली आणि स्वतः दुसऱ्या दहशतवाद्याचाही खात्मा केला. या कारवाईत जाधव यांना गोळी लागली. त्यानंतर पेट्रोल बॉम्बमुळे आगीने लपेटलेल्या घरातच गोळी लागून जखमी झालेल्या प्रकाश जाधव यांना वीरमरण प्राप्त झाले.

निपाणी पासून 5 कि. मी. अंतरावर असणाऱ्या बुदिहाळ या छोट्याशा गावातील जवान प्रकाश जाधव यांचे प्राथमिक माध्यमिक शिक्षण श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूलमध्ये तर महाविद्यालयीन शिक्षण अर्जुननगर येथील देवचंद महाविद्यालयात झाले. जाधव हे 2007 मध्ये बेळगावला मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये भरती झाले होते.Martyrs keerti chakra

त्यांनी 11 वर्षे जम्मू-काश्मीर, हरियाणा बेंगलोरसह विविध ठिकाणी सेवा बजावली. जवान प्रकाश जाधव 2018 मध्ये हुतात्मा झाले, त्यावेळी त्यांची चिमुकली 3 महिन्याची होती. या चिमुकलीवरील पितृछत्र हरपल्याने अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला होता. तसेच तालुक्यावर शोककळा पसरली होती. आपला मुलगा शहीद झाल्यानंतर सैन्य दलातील निवृत्त जवान पुंडलिक जाधव हे आपले वडील पण समर्थपणे पार पाडताना वीरपत्नी, वीरमाता वीरकन्या यांच्यासह सर्वांनाच आधार देत आहेत.

प्रकाश जाधव यांनी वीरमरण पत्करले यानंतर परिसरातील युवकांमध्ये सैन्य दलात भरती होण्याची व देशासाठी लढण्याची उमेद वाढल्याचे सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या संख्येतून स्पष्ट होत आहे अशा परिस्थितीत जाधव यांना जाहीर करण्यात आलेल्या मरणोत्तर कीर्ती चक्राचे वृत्त समजताच अनेकांनी वीर जवान प्रकाश जाधव यांच्या आठवणींना उजाळा दिला, तर अनेकांनी सामाजिक माध्यमातून हुतात्मा प्रकाश जाधव यांना मानवंदना दिली. कीर्ती चक्र पुरस्कार असाधारण शौर्य आणि बलिदानासाठी दिला जातो. देशात आत्तापर्यंत 483 जवानांना (198 मरणोत्तर) किर्ती चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.