उच्च न्यायालयाचा स्थगिती आदेश असताना देखील हलगा -मच्छे बायपास रस्त्याचे काम हाती घेण्याचा कंत्राटदाराचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडून काम बंद केल्याची घटना आज सकाळी अनगोळ शिवारात घडली.
बेळगावच्या चौथ्या दिवाणी न्यायालयाने हलगा -मच्छे बायपासला स्थगिती दिली असून त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण पुन्हा एकदा तोंडघशी पडले आहे. न्यायालयाने संबंधित जागेत काम करण्यास व पिकांना हात लावण्यास सक्त मनाई केली आहे.
तथापि न्यायालयाचा स्थगिती आदेश झुगारून आज सकाळी अनगोळ शिवारामध्ये बायपाससाठी सपाटी करण्याचे काम सुरू करण्यात आले होते. पावसामुळे चिखल झाला असल्यामुळे सपाटी करण्याच्या कामासाठी दोन पोकलँब मशिने दाखल झाल्या होत्या.
मात्र शेतकऱ्यांना वेळीच याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जाब विचारला. तसेच न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची प्रत दाखवून सुरू झालेले काम थांबविले. आदेश पत्रासह शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेऊन जाब विचारताच पोकलँबवरील कामगारांनी मशीन तेथेच सोडून घटनास्थळावरून काढता पाय घेतला.
याप्रसंगी शेतकरी नेते राजू मरवे, गोपाळ सोमनाचे, भोमेश बिर्जे, तानाजी हलगेकर, सुभाष चौगुले आदींसह बरेच शेतकरी उपस्थित होते. बायपास रस्त्याचे कंत्राट घेतलेल्या कंपनीने या कामासाठी झारखंड व अन्य भागातून कामगार मागविले आहेत त्यामुळे या कामगारांची राहण्याची सोय बायपास नजीक राहुट्यांमध्ये करण्यात आली आहे. या कामगारांकडून रात्रीच्या वेळी हायमास्ट दिवे लावून बायपासचे काम केले जात असल्याची माहिती येथील जवळच्या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून आज शेतकऱ्यांना मिळाली आहे.
न्यायालयाने स्थगिती आदेश दिला तरी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अद्याप बायपासच्या ठिकाणी असलेली आपली यंत्रसामुग्री हटविलेली नाही. त्यामुळे कोणत्याही क्षणी आदेश डावलून काम सुरु केले जाण्याची शक्यता शेतकऱ्यांनी गृहीत धरली होती. त्यासाठी ते सावध होते आणि त्यामुळेच आज सकाळी पुनश्च सुरू झालेले बायपासचे काम त्यांनी बंद पाडले. आता रात्रीच्या वेळी बायपासचे काम केले जात असल्याची माहिती मिळाल्याने शेतकरी अधिकच सावध झाले आहेत.