खानापूर ते पिरनवाडी रस्ता आणि हलगा ते मच्छे बायपासचे काम येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्याच्या सूचना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने संबंधित कंत्राटदाराला केल्या आहेत. परिणामी हलगा -मच्छे बायपासचे काम आता वेगाने होण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक महिन्यापासून खानापुर ते बेळगाव रस्त्याचे काम सुरू असून गणेबैल ते खानापूर आणि मच्छे ते झाडशहापूर परिसरात रस्त्याचे काम बाकी आहे. इतर भागातील कामे पूर्ण झाली आहेत.
त्यामुळे झाडशहापूर येथील उड्डाणपूल आणि इतर कामे लवकरच पूर्ण केली जातील. गणेशबैल येथील टोलनाक्याची काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून येत्या 8 ते 10 दिवसांत संबंधित काम पूर्ण केले जाणार आहे. इतर कामेही लवकर पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
खानापूरचे काम पूर्ण होत असतानाच हलगा -मच्छे बायपासचे कामही लवकर पूर्ण करण्यासाठी पोलीस बळाचा वापर सुरु आहे. त्याला शेतकऱ्यांकडून तीव्र विरोध होत असला तरी येणाऱ्या काळात दडपशाही करून का होईना परंतु बायपास रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे.
हलगा -मच्छे बायपासच्या पट्ट्यात येणाऱ्या तीन उड्डाणपुलांचे काम वगळता इतर कामे लवकर पूर्ण केली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा विरोध डावलला जाण्याची शक्यता अधिक असून शेतकऱ्यांना न्यायालयीन लढा तीव्र करावा लागणार आहेत.