व्यस्त आणि गोंगाट पूर्ण रहदारी टाळण्यासाठी बेळगाव शहरासह जिल्ह्यातील काम करणारे अनेक व्यवसायिक आपल्या कार्यालयाकडे जाण्यासाठी आता आठवड्यातून एखाद दुसरा दिवस सायकलवरून जाणे पसंत करत आहेत. तथापि मुख्य रस्त्यांशेजारील सायकल ट्रॅकवर झालेले विक्रेत्यांचे व बेकायदा पार्किंगचे अतिक्रमण त्यांच्यासाठी अडथळ्याची शर्यत ठरत आहेत.
नागरिकांसाठी रस्त्याशेजारील समर्पित सायकल ट्रॅकची गरज लक्षात घेऊन बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने बेळगावातील स्मार्ट रस्त्यांची योजना आखून त्याची अंमलबजावणी करताना त्यामध्ये ‘सायकल ट्रॅक’ हा अविभाज्य घटक सामील केला आहे. तथापि सध्या शहरातील एकही सायकल ट्रॅक असा नाही की ज्यावरून सायकल चालवत जाता येते. जवळपास सर्वच सायकल ट्रॅकवर बेकायदेशीररित्या वाहन पार्किंग, फळ विक्रेते, फास्ट फुड व्यवसायिक यांनी अतिक्रमण केले आहे. बेंगलोर शहर हे ज्याप्रमाणे उद्यानाचे शहर अर्थात गार्डन सिटी आहे. तसेच बेळगाव हे विपुल हिरवळ व वृक्षवल्लरिमुळे हरित शहर अर्थात ग्रीन सिटी म्हणून सुपरिचित आहे. येथील नागरिक हे पर्यावरणाच्या बाबतीत अत्यंत जागरूक असल्यामुळे येथील रस्त्याशेजारी आणि खुल्या जागांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष दिसून येतात. यात भर म्हणून येथील कामगार बंधू मोठ्या प्रमाणात सायकलींचा वापर करतात. त्याचप्रमाणे अलीकडे बरेच नागरिक आपले कार्यालय अथवा बाजारात जाण्यासाठी कारगाड्यांऐवजी सायकलचा वापर करू लागले आहेत. हा जो बदल आहे तो इंधन वाचविण्यासाठी नसून आरोग्यपूर्ण तंदुरुस्त राहण्यासाठी आहे.
शहरात नागरिकांसाठी समर्पित सायकलिंग ट्रॅक असावा अशी लोकांची मागणी असल्यामुळे बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड आणि सार्वजनिक बांधकाम खात्याने शहरात नवे रस्ते बांधताना सायकल ट्रॅक देखील निर्माण केले. तथापि या रस्त्यांपैकी बहुतांश रस्त्यांच्या दुतर्फा फळविक्रेते आणि फास्ट फूड स्टॉल धारकांनी अतिक्रमण केले आहे. त्याचप्रमाणे ऑटोरिक्षा आणि टॅक्सी चालक या सायकलिंग ट्रॅक्टरचा आपली वाहने पार्क करण्यासाठी वापर करत आहेत.
यासंदर्भात बोलताना सायकलिस्ट विराज डोंगरे यांनी सध्या शहरातील प्रमुख रस्ते इतके गजबजलेले असतात की त्यावरून सायकल चालवत जाणे अत्यंत धोकादायक बनले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सायकलिंग ट्रॅक निर्माण करण्यात आले असले तरी ते फळविक्रेते आणि वाहनांनी व्यापलेले असतात. त्यामुळे आता नव्याने निर्माण केले जाणारे सायकल ट्रॅक हे सायकलींच्या रहदारीसाठी खुले ठेवले गेले पाहिजेत असे सांगून नागरिकांनी सायकल चालविण्यासाठी सायकल ट्रॅकचा वापर करावा यासाठी जनजागृती करणे ही गरजेचे आहे, असे मत व्यक्त केले.
दरम्यान सायकलिंग ट्रॅकसंदर्भात बोलताना बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण बागेवाडी यांनी शहरातील कांही रस्त्यांवरील सायकल ट्रॅक खुले आहेत. मात्र नागरिक अद्यापही त्यांचा वापर करत नाहीत. आम्ही या मार्गांवरील बेकायदा अतिक्रमण हटविले आहेत. येत्या कांही दिवसात सार्वजनिक खाजगी भागीदारीत आम्ही शहरात भाडेतत्त्वावर सायकली देण्याचा विचार करत आहोत असे स्पष्ट केले.