बेळगाव जिल्ह्यातील कालच्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये काल शुक्रवारी संथ गतीने मात्र गुरूवारच्या तुलनेत जवळपास दुपटीने वाढ झाली असून काल नव्याने 9 कोरोनाबाधित आढळून आले.
बेळगाव जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या काल शुक्रवारी 64 झाली होती. गेल्या आठवड्याभराच्या कालावधीत प्रारंभी घटलेली कोरोना बाधितांची संख्या पुन्हा संथ गतीने वाढू लागली आहे.
गेल्या शनिवारी जिल्ह्यात 4 कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर सोमवारी 22 नोव्हेंबर रोजी या संख्येत एकदम घट होऊन संपूर्ण जिल्ह्यात अवघा 1 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. त्यामुळे आरोग्य खात्याला मोठा दिलासा मिळून बाधितांची संख्या शून्यावर पोहोचेल असा विश्वास निर्माण झाला होता.
मात्र मंगळवारपासून पुन्हा संथ गतीने कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ झाली असून गुरुवारी 5 असणारी नव्याने आढळलेल्या कोरोना बाधितांची संख्या जवळपास दुपटीने वाढून काल शुक्रवारी 9 झाली होती.
दरम्यान कोरोनाच्या वाढत्या रूग्णांच्या आणि आफ्रिकेत सापडलेल्या नवीन कोरोना व्हेरियंटच्या पाश्वभूमीवर राज्य सरकार सतर्क झाले असून परदेशातून येणाऱ्यावर कडी नजर ठेवली जाणार आहे.