बेळगाव महापालिका निवडणुकीमध्ये गैरव्यवहार झाला असल्यामुळे ही निवडणूक रद्द करावी, अशी मागणी करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली असून त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी व महापालिका आयुक्तांसह निवडणूक रिंगणातील कांही उमेदवार अशा 14 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे.
बेळगाश महापालिका निवडणुकीप्रसंगी मतदान यंत्राला व्हीव्हीपॅट मशीन जोडण्यात आले नव्हते. त्यामुळे मतदान कोणाला झाले याची खातरजमा करता येत नाही. मतदार यादीत मृतांची नांवे समाविष्ट करण्यात आली होती.
त्यांच्या नांवाने बोगस मतदान झाल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया बेकायदेशीर झाली असल्याने ही निवडणूक रद्द करण्यात यावी, अशी मागणी शिवा चौगुले यांनी केली आहे. हा लढा जोवर न्याय मिळत नाही तोपर्यंत लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
सहाव्या जिल्हा अतिरिक्त दिवानी न्यायालयाने त्यांची याचिका दाखल करून घेतली असून याबाबत जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ आणि महापालिका आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांच्यासह 14 जणांना नोटीस बजावण्यात आली आहे महापालिका निवडणुकी विरोधात दाखल झालेली ही तिसरी याचिका आहे.
याआधी राजश्री हावळ यांच्यासह आणखी एका उमेदवाराने मनपा निवडणुकी विरोधात याचिका दाखल केली आहे. आज दाखल करण्यात आलेल्या याचिकेमुळे वादग्रस्त बेळगाव महापालिका निवडणूक प्रक्रिया पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.