लोंढा (ता. खानापूर, जि. बेळगाव) वनविभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर अर्थात वनक्षेत्रपाल प्रशांत गौराणी यांनी कपाळाला पिस्तुल लावून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याची तक्रार भाजप नेते व माजी जि. पं. सदस्य बाबूराव देसाई यांनी खानापूर पोलिसांना दिली आहे. खानापूर भाजपकडून शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली.
गेल्या रविवारी वनक्षेत्रपाल गौराणी यांनी देसाई यांना आपल्या कार्यालयात बोलावून पूर्ववैमनस्यातून अर्वाच्च शिवीगाळ केली व जीवे मारण्याची धमकी दिली, अशा अधिकाऱ्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी अन्यथा तीव्र प्रतिक्रिया उमटतील असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष संजय कुबल यांनी पत्रकार परिषदेत दिला.
याप्रसंगी बेळगाव जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रमोद कोचरी, विठ्ठल हलगेकर, किरण येळ्ळूरकर, सुरेश देसाई ॲड. चेतन मणेरीकर, आकाश अथणीकर, पंडित ओगले आदी उपस्थित होते. लोंढा विभागाचे रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत गौरानी यांनी आपल्या कपाळाला पिस्तूल लावून आवाज कराल तर जीवे मारू अशी धमकी दिल्याची माहिती भाजपचे माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई यांनी दिली आहे.
सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एका माजी जि. पं. सदस्याला या रेंज फॉरेस्ट ऑफिसरकडून थेट कपाळाला पिस्तूल लावून धमकावले जाते, मग सामान्य लोकांना हा अधिकारी काय वागणूक देत असेल? असा सवाल करत देसाई यांनी केला आहे. तसेच वनखात्याच्या वरिष्ठांनी याची गांभीर्याने दखल घेऊन मला न्याय द्यावा अन्यथा मी बेळगाव येथील जिल्हा अरण्य अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आत्मदहन करेन, असा इशाराही बाबुराव देसाई यांनी दिला आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना बाबुराव देसाई म्हणाले की, लोंढा परिसरातील विकास कामाला रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत गौराणी नेहमी अडथळे आणत आहेत. त्यामुळे भोसे मार्गावरील पुलाचे काम रखडले आहे. तसेच वनखात्याच्या हद्दीत विद्युत खांब बसविण्यास रेंज फॉरेस्ट ऑफिसरने विरोध केल्याने मासाळी गावात गेल्या आठ दिवसांपासून पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या संदर्भात मी शनिवारी त्यांना फोनद्वारे तुम्ही विकास कामात अडथळे आणू नका. यापूर्वी जितके रेंज रेंज फॉरेस्ट ऑफिसर लोंढ्याला आले त्या सर्वांनी विकास कामांना सहकार्य केले आहे. त्याप्रमाणे तुम्ही देखील सहकार्य करा, अशी केवळ विनंती केली. त्यावेळी त्यांनी आपण नंतर बोलतो म्हणून त्यांनी फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा मी दोन-तीन वेळा फोन करून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी गौराणी यांनी तुम्हाला कधी फोन करायचा समजत नाही का? असे म्हणत अरेरावीची भाषा वापरली. मी देखील तुम्ही अरेरावीची भाषा बोलू नका जरा भान ठेवून बोला असे म्हंटले. त्यावेळी त्यांनी रागाने पुन्हा फोन ठेवला. त्यानंतर रविवारी सकाळी 8 -10 फॉरेस्ट गार्ड माझ्या घरी पाठवले. त्यावेळी मी गार्डकडे चौकशी केली तसेच मी काय वाळू चोर किंवा लुटारू आहे काय? एवढे लोक पाठवायची गरज काय होती? असा त्यांना सवाल केला.
गार्डने तो निरोप रेंजरना दिला. त्यावर रेंजर प्रशांत गौराणी यांनी पुन्हा मला फोन करून ‘तू सरळ येणार की नाही. मी आलो तर घरातून ओढून काढून मारत ऑफिसकडे आणेन असे म्हणून धमकावले. त्यानंतर मी एकटाच रेंज फॉरेस्ट ऑफिसकडे गेलो. त्यावेळी गौराणी आणि माझ्या समोर 10 -12 गार्डना उभे केले व सरळ हातातील पिस्तूल घेऊन माझ्या कपाळाला लावली. तसेच आवाज करशील तर काय करेन बघ असे धमकावले. त्यावेळी मी देखील जरूर माझ्या कपाळावर पिस्तूल चालवा असे त्यांना सांगितले. त्यानंतर आमच्यात शाब्दिक चकमक झाली आणि मी रागारागाने घरी परतलो. एकूणच रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रशांत गौराणी यांच्यापासून माझ्या जीवाला धोका असल्याने याची वरिष्ठांनी तातडीने दखल घ्यावी अन्यथा मला नाईलाजाने जिल्हा अरण्य अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन शिवाय दुसरा पर्याय राहणार नाही, असा इशाराही बाबुराव देसाई यांनी दिला.