बेळगाव शहरातील वातावरणात पुन्हा एकदा बदल झाला आहे .बुधवारी पहाटेपासून ढगाळ वातावरण आणि सकाळी पडलेला पाऊस त्यामुळे विचित्र वातावरणाचा अनुभव बेळगावकर नागरिकांना घ्यावा लागला आहे.
रविवारपासून पावसाचे प्रमाण थांबले होते. त्यामुळे बेळगाव शहरात पहाटेच्या वेळी धुके पडण्यास सुरुवात झाली होती. एकदा धुके पडले की हिवाळा प्रत्यक्षात सुरू होईल, असा अंदाज नागरिकांनी व्यक्त केला होता.
मात्र रात्रीच्या वेळी थंडी असली तरी पहाटे वातावरण ढगाळ झाले आणि उष्णतेत वाढ झाली. यानंतर सकाळी पावणेआठच्या सुमारास शहरात वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या पावसाने मारा केला असून त्यामुळे विचित्र वातावरण निर्माण झाले आहे.
बेळगाव शहरात नोव्हेंबर महिन्यात कडक थंडी पडते ,सुंदर अशा गारव्याचा अनुभव बेळगाव वासियांना मिळतो, मात्र असा अनुभव या वर्षी तरी अद्याप मिळालेला नाही .काही प्रमाणात थंडी असली तरी प्रत्यक्षातील बेळगावचा हिवाळा अद्याप अनुभवायला मिळाला नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. या पार्श्वभूमीवर आता लवकरात लवकर वातावरण ठीक व्हावे आणि सुंदर गारव्याची अनुभूती घेता यावी अशीच इच्छा व्यक्त होत आहे.
भात कापणी करून ठेवलेल्या आणि मळणी न केलेल्या बेळगावातील शेतकऱ्यांसाठी हे वातावरण चिंता वाढवणारे आहे. या कोसळणाऱ्या पावसाकडे बघून शेतकऱ्यां बरोबर विद्यार्थी नागरिक व्यापारी आणि ज्यांची विवाह सोहळे सुरू आहेत असे सर्वजण हवालदिल झाले आहेत.प्रत्येक जण हाच प्रश्न विचारत आहेत पाऊस खुळा झालाय की काय?