‘मराठ्यांनी अटकेपार झेंडे लावले’ असे म्हंटले जाते. याचा खरा अर्थ फार कमी लोकांना माहीत आहे. यातील ‘अटक’ हे किल्ल्याचे नांव असून जो पाकिस्तान व्याप्त पंजाब प्रांतात आहे. दीपावली निमित्त या अटक किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती शहरातील भांदूर गल्ली येथील स्वराज्य मित्र मंडळाच्या बाळगोपाळांनी साकारली असून हा किल्ला पाहण्यासाठी गर्दी होत आहे.
दरवर्षी दीपावलीनिमित्त भांदूर गल्ली येथील स्वराज्य मित्र मंडळाच्या बाळगोपाळांकडून हिंदवी स्वराज्यातील ठराविक किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते. गेल्या सात-आठ वर्षांपासून भांदूर गल्लीतील बालगोपाळ किल्ले बनवत असून मराठा साम्राज्यातील स्मृती आड गेलेले अपरिचित किल्ले बनविणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.
यंदा त्यांनी पाकिस्तान व्याप्त पंजाब प्रांतातील ‘अटक किल्ला’ या किल्ल्याची प्रतिकृती उभारली आहे. पंजाब प्रांतातील हा किल्ला बादशहा अकबर याने 1581 साली बांधला होता. किल्ला बांधून पूर्ण होण्यासाठी 2 वर्षे 2 महिने इतका कालावधी लागला होता.
विशेष म्हणजे हा किल्ला बांधण्यासाठी बनारस आत्ताचे प्रयागराज येथून कारागीर मागविण्यात आले होते. श्रीनगर पासून 252 कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उत्तर भारतातील आपल्या स्वारीप्रसंगी हा किल्ला काबीज केला होता.
स्वराज्य मित्र मंडळाच्या बाळगोपाळांनी या किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती निर्माण करताना किल्ल्यातील महत्त्वाची स्थळे दाखविली आहेत. किल्ल्याची प्रतिकृती अतिशय लक्षवेधी असल्यामुळे सध्या हा किल्ला पाहण्यासाठी शिवप्रेमींची गर्दी होत आहे.