केंद्र व राज्य सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी केल्यामुळे बेळगावात पेट्रोल व डिझेलच्या दरात मोठी घट झाली. केंद्राचा नवा दर गुरुवारपासून तर राज्याचा नवा दर शुक्रवारपासून लागु झाला.
बेळगावात शनिवारी पेट्रोल दर १००.३५ पैसे तर डिझेलचा दर ८४.८३ पैसे होता. पेट्रोल १३.३२ तर डिझेल १९.४७ पैसे कमी झाला. यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.खिसा मोजून पेट्रोल भरणारे हात आता काहीप्रमाणात मोकळे झाले आहेत.
केंद्र सरकारने बुधवारी पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये, तर डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपये कमी केले. त्यानंतर राज्य सरकारने देखील गुरुवारी पेट्रोल व डिझेलच्या दरात प्रतिलिटर ७ रुपये कमी केले.
बुधवारी बेळगाव शहरातील पेट्रोलचा दर ११३.६७ पैसे होता. तर डिझेल १०४.३० रुपये होता. केंद्र व राज्याचा दर लागु झाल्यानंतर यामध्ये मोठा बदल झालेला आहे. बेळगावात यापूर्वी जुन महिन्यात पेट्रोल दर १०० च्या घरात होता. त्यानंतर गेल्या चार महिन्यात हा दर ११३ पर्यंत पोहचला होता. तसेच मार्च महिन्यात डिझेल ८५ रुपये होते. त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात १०४ पर्यंत गेले होते. आता यामध्ये मोठी कपात झाल्यामुळे हे दर कमी झाले आहेत. बेळगावला महाराष्ट्र राज्याची सीमा लागु आहे.
महाराष्ट्रात फक्त केंद्राचे उत्पादन शुल्क कमी केले आहे. महाराष्ट्र राज्याने आपला कर कमी केला नाही. यामुळे महाराष्ट्रात पेट्रोल सरासरी ११० रुपये तर डिझेल ९२ रुपये आहे. कर्नाटक व महाराष्ट्रात पेट्रोलमध्ये १० रुपये तर डिझेलमध्ये ७ रुपयांचा फरक आहे.
बेळगावला चंदगड तालुक्याची सीमा लागुन आहे. यामुळे चंदगडसह इतर भागातील वाहनधारक बेळगावाला पेट्रोल भरण्यासाठी येत आहेत.यामुळे बेळगावातील पेट्रोल पंप चालकांची सध्या चांदी सुरू आहे.