शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि बेळगाव शहर यांचे एक सर्वांग सुंदर असे नाते होते. बाबासाहेबांच्या जाण्याने बेळगावातील शिवप्रेमींची हानी झालीच याशिवाय बेळगावातील नागरिकांना छत्रपती शिवरायांच्या बद्दल मार्गदर्शन करणारे आणि तसे जगायला शिकवणारे शाहीर गेल्याची खंत अनेकांना नक्कीच लागून राहणार आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावर अभ्यास केल्यानंतर सर्वप्रथम व्याख्यानांच्या माध्यमातून जाणताराजा चे प्रयोग करण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी युनियन जिमखान्यावर बाबासाहेब पुरंदरे यांच्या व्याख्यानांचे आयोजन बेळगावातील प्रमुख विभूतींनी केले होते.
स्टेडियम वजा जागेत रोज नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात येत होती. त्यावेळी बाबासाहेबांच्या तोंडातून छत्रपती शिवरायांचा जाज्वल्य इतिहास ऐकण्यासाठी फक्त बेळगावकरच नव्हे तर आसपासच्या पंचक्रोशीतील नागरिक जमा होत असत.
सीमाभागात घराघरात शिवाजी महाराज नेऊन पोहचवणे आणि येथील मराठी अस्मितेला बळकटी देण्यामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचे योगदान सर्वात मोठे आहे.
त्यानंतर त्यांनी जाणता राजा या महानाट्याची निर्मिती केली या महानाट्याचे प्रयोग महाराष्ट्रात आणि सर्वत्र देशभर होत असताना ही महान कलाकृती बेळगाव येथे आयोजित करण्याचा निर्णय तरुण भारत ट्रस्ट या संस्थेने घेतला. त्यामुळे 2005 आणि 2006 ही दोन वर्षे सलग दोनदा जाणता राजा या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले होते.
प्रचंड मोठ्या संख्येने आणि लाखोंच्या घरात नागरिकांनी जाणता राजा प्रयोगाचा अनुभव घेतला होता. या दोन्ही वेळा स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी भेट देऊन आपल्या खड्या आवाजात बेळगावातील प्रयोगांची सुरुवात केली होती. तसेच येथील स्थानिक कलाकारांना जाणताराजा मध्ये सहभागी करून घेऊन अभिनयाची शिकवण आणि यासंदर्भातील मार्गदर्शनही केले होते. 2018 मध्ये पुन्हा एकदा तरुण भारत ट्रस्ट या संस्थेने जाणता राजा चे बेळगावात आयोजन केले त्यावेळी ही स्वतः बाबासाहेब पुरंदरे बेळगावला आले होते.
बाबासाहेब पुरंदरे म्हणजे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचा एक चालता बोलता चित्रपट होता. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या बद्दल त्यांनी बोललेलं, ऐकायला,त्यांच्याशी बोलायला शिवचरित्राचे अभ्यासक पत्रकार आणि चाहते गर्दी करत असत. बाबासाहेब पुरंदरे यांचा सहवास त्यांचे वास्तव्य आणि त्यांची झलक यापुढे लाभणार नाही याचे दुःख समस्त बेळगावकर नागरिकांना आणि शिवप्रेमींना सातत्याने वाटणार आहे.